वॉशिंग्टन : क्वांटिनम कंपनीच्या शास्त्रज्ञांनी ‘क्वांटम एरर करेक्शन’ (त्रुटी सुधारणा) क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केल्याचा दावा केला आहे. या महत्त्वपूर्ण यशामुळे मोठ्या प्रमाणावर काम करणारे आणि दोषमुक्त क्वांटम संगणक प्रत्यक्षात येण्याचे स्वप्न एक पाऊल पुढे सरकले आहे.
शास्त्रज्ञांच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या ९८-क्यूबिट ‘हेलिओस’ क्वांटम प्रणालीने क्वांटम मेमरीच्या चाचण्यांमध्ये केवळ ०.०००५ टक्के इतका अल्प अपयश दर नोंदवला आहे. याचाच अर्थ, त्रुटी तपासणीच्या दहा लाख (१ मिलियन) फेऱ्यांमध्ये अंदाजे केवळ पाच ने सुधारता येण्याजोग्या त्रुटी आढळल्या आहेत. या कामगिरीने गुगलच्या १०५-क्यूबिट ‘विलो’ क्वांटम चिपने प्रस्थापित केलेला मागील विक्रम मागे टाकला आहे. तुलनात्मक चाचण्यांमध्ये गुगलच्या चिपमध्ये दहा लाख फेऱ्यांमध्ये अंदाजे ७७२ न सुधारता येण्याजोग्या त्रुटी आढळल्या होत्या, ज्याचा त्रुटी दर ०.०७७२ टक्के इतका होता. या निकालामुळे क्वांटम संगणन क्षेत्र ‘मेगाक्वॉप टप्प्याच्या’ (megaquop regime) अधिक जवळ पोहोचले आहे.
या टप्प्यात संगणक प्रणाली कोणतीही त्रुटी न येता दहा लाखांहून अधिक क्रिया (operations) पूर्ण करू शकतात, असे संशोधकांनी सांगितले. संशोधकांनी १६ ऑक्टोबर रोजी ‘arXiv’ या प्रीप्रिंट सर्व्हरवर प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात या निष्कर्षांची सविस्तर माहिती दिली आहे. सँडिया नॅशनल लॅबोरेटरीजच्या ‘क्वांटम परफॉर्मन्स लॅब’चे सह-संचालक रॉबिन ब्लूम-कोहाउट (जे या संशोधनात सहभागी नव्हते) यांनी एका निवेदनात या यशाचे कौतुक केले आहे. ‘‘क्वांटम संगणक क्षेत्रातील संशोधक अनेक वर्षांपासून ज्या ध्येयासाठी काम करत होते, तो हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे,’’ असे ते म्हणाले. ‘‘या प्रणालीची व्याप्ती वाढवल्यास (scaled-up version), दहा लाखांपेक्षा कमी भौतिक क्यूबिटस्च्या व्यवहार्य आकारातच उपयुक्त आणि दोषमुक्त संगणकासाठी आवश्यक असलेली विश्वासार्हता गाठता येऊ शकते. यामुळे व्यावहारिक क्वांटम संगणकाचे भविष्य अधिक उज्ज्वल झाले आहे,’’ असेही ब्लूम-कोहाउट यांनी नमूद केले.