मारियाना : समुद्राच्या तळाशी, अगदी 6 किलोमीटर खाली, एक वेगळेच जग आहे, हे नवीन संशोधनातून समोर आले आहे. शास्त्रज्ञांनी समुद्राच्या अगदी खोल भागात, म्हणजे मारियाना खंदकासारख्या ठिकाणी, हजारो प्रकारचे सूक्ष्मजीव शोधले आहेत. हे सूक्ष्मजीव याआधी कधीच दिसले नव्हते. समुद्राच्या या भागाला ‘हॅडल झोन’ म्हणतात. हा हॅडल झोन 6 किलोमीटरपासून सुरू होतो आणि 11 किलोमीटरपर्यंत खाली जातो. म्हणजे, इतका खोल की 30 एम्पायर स्टेट बिल्डिंग्ज किंवा दीड माउंट एव्हरेस्ट त्यात मावू शकतील.
समुद्राच्या इतक्या खोलीवर जीवन जगणे खूप कठीण असते. तापमान जवळपास गोठणबिंदूच्या जवळ असते. पाण्याचा दाब प्रचंड असतो. खाण्यायोग्य पोषक घटक खूप कमी असतात. पण, तरीही शास्त्रज्ञांना इथे 7500 पेक्षा जास्त प्रकारचे सूक्ष्मजीव सापडले, ज्यातले 90% पूर्णपणे नवीन होते! चिनी शास्त्रज्ञांनी या खोलीवर 33 वेळा पाणबुडीने प्रवास केला. यासाठी माणसाने चालवलेली पाणबुडी वापरली गेली. त्यांनी तिथून माती आणि समुद्राच्या पाण्याचे नमुने घेतले. मग या नमुन्यांचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. या विश्लेषणातून आलेले निष्कर्ष धक्कादायक होते.
शास्त्रज्ञांना असं आढळलं की या सूक्ष्मजीवांकडे जगण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत. यातील पहिला मार्ग म्हणजे, साधी पण कार्यक्षम जीवनशैली. या सूक्ष्मजीवांमध्ये छोटे जीनोम असतात, ज्यामुळे ते अगदी कमी संसाधनांमध्येही जगू शकतात. त्यांच्यात एन्झाइम असतात, जे त्यांना समुद्राच्या प्रचंड दाब आणि थंडीचा सामना करण्यास मदत करतात. याशिवाय, दुसरा मार्ग म्हणजे लवचिक आणि बहुमुखी सूक्ष्मजीव. काही सूक्ष्मजीवांमध्ये मोठे जीनोम असतात. ते वेगवेगळ्या वातावरणात जगू शकतात आणि विविध पोषक घटकांचा वापर करू शकतात.
सूक्ष्मजीवांव्यतिरिक्त, शास्त्रज्ञांना लहान क्रस्टेशियन्स आणि घुशी मासे देखील सापडले, जे आश्चर्यकारक होते, कारण यापूर्वी हे ज्ञात नव्हते की अशा प्रजाती इतक्या खोल पाण्यात राहू शकतात. शिवाय, तीव— थंडी आणि उच्च दबाव सहन करू शकतात. या नव्या संशोधनामुळे प्रथमच त्याची माहिती मिळते आहे. विशाल प्रशांत महासागरात स्थित, डीप चॅलेंजर हा सर्वात खोल बिंदू आहे. मारियाना खाईसह स्थित असलेला हे नैसर्गिक अद्वितीय ठिकाण महासागराच्या तळाशी अस्तित्वात असलेल्या अनोळखी क्षेत्रांचे उदाहरण आहे. मारीआना खाई ही स्वतः एक भव्य अर्धचंद्राकार खाई आहे, ज्याची लांबी सुमारे 2,550 किलोमीटर आणि रुंदी 69 किलोमीटर आहे.