Fungal infection treatment | बुरशीजन्य संसर्गावर नवीन उपचार पद्धती Pudhari File Photo
विश्वसंचार

Fungal infection treatment | बुरशीजन्य संसर्गावर नवीन उपचार पद्धती

पुढारी वृत्तसेवा

लंडन : ‘अस्परगिलस फुमिगेटस’ (Aspergillus fumigatus) या बुरशीमध्ये आढळणार्‍या एका विषाणूमुळे या बुरशीची जगण्याची क्षमता वाढते. यामुळे, भविष्यात या बुरशीमुळे होणार्‍या संसर्गावर उपचार करण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरू शकते, असे नवीन संशोधनातून समोर आले आहे.

‘ए. फुमिगेटस पॉलिमायकोव्हायरस-1 ( AfuPmV-1 M)’ नावाचा हा विषाणू, ‘अस्परगिलस फुमिगेटस’ या बुरशीमध्ये आधीपासूनच अस्तित्वात असल्याचे माहीत होते. परंतु, एका नव्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, हा विषाणू बुरशीला अनेक महत्त्वाचे फायदे देतो, ज्यामुळे तिची जगण्याची क्षमता वाढते. ‘अस्परगिलस’ बुरशीचे बीजाणू श्वासावाटे आत गेल्यास, माणसांना संसर्ग होऊ शकतो. यामुळे कमी किंवा जास्त कालावधीसाठी फुफ्फुसांचा संसर्ग होतो किंवा ‘इनवेसिव्ह’ रोग होऊ शकतो, जो फुफ्फुसांच्या बाहेरही पसरतो. हिब्रू विद्यापीठाच्या संशोधिका मरीना कॅम्पोस रोचा यांच्या मते, अनेक लोक दररोज हे बीजाणू श्वासावाटे घेतात. परंतु, सहसा ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशा लोकांनाच या बुरशीचा संसर्ग होतो.

फुफ्फुसांचा आजार असलेल्या रुग्णांनाही याचा धोका असतो. जगभरात दरवर्षी सुमारे 65.5 लाख गंभीर बुरशीजन्य संसर्ग होतात, त्यापैकी 21 लाख ‘इनवेसिव्ह अ‍ॅस्परजिलोसिस’ आणि 18 लाख जुनाट फुफ्फुसांच्या संसर्गाची प्रकरणे ही या बुरशीमुळे होतात. ‘इनवेसिव्ह अ‍ॅस्परजिलोसिस’ या संसर्गामुळे जगभरात 30% ते 80% मृत्यू होतात. ‘नेचर मायक्रोबायोलॉजी’ (Nature Microbiology) जर्नलमध्ये 14 ऑगस्ट रोजी प्रकाशित झालेल्या नवीन संशोधनात, शास्त्रज्ञांनी उंदरांवर प्रयोग केले. त्यांनी उंदरांना ‘ए. फुमिगेटस्’ बुरशीचा संसर्ग दिला, जी आधीपासून ‘AfuPmV-1 M’ या विषाणूने संक्रमित होती.

संशोधनासाठी वापरलेली ही बुरशी, ‘अ‍ॅस्परजिलोसिस’मुळे मरण पावलेल्या एका रुग्णाच्या फुफ्फुसातून वेगळी काढण्यात आली होती. संशोधकांनी उंदरांना अँटिव्हायरल (antiviral) औषधे दिल्यावर, त्यांच्या जगण्याचा दर सुधारला, फुफ्फुसांमधील बुरशीचे प्रमाण कमी झाले आणि विषाणूची पातळीही कमी झाली. दुसर्‍या शब्दांत सांगायचे, तर केवळ विषाणूला लक्ष्य करून संशोधकांनी उंदरांमधील बुरशीजन्य संसर्ग कमी केला, असे रोचा यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT