लंडन : आर्क्टिक हिवाळ्याच्या दिवसांमध्ये समुद्रावर बर्फामधून काही संशोधक एक छिद्र पाडतात आणि त्यामध्ये हायड्रोजनवर चालणारा पंप टाकतात. हा पंप समुद्रातील पाणी शोषून घेऊन बर्फाच्या पृष्ठभागावर टाकतो, ज्यामुळे बर्फाचा पातळ थर तयार होतो. रात्रभर हे पाणी गोठून तेथील बर्फ अधिक जाड होण्यास मदत करते. अशी आशा आहे की, बर्फ जितका मजबूत असेल तितका तो उन्हाळ्याच्या गरम महिन्यांत टिकून राहण्याची शक्यता जास्त असते.
उपग्रहांनी नोंद घेण्यास सुरुवात केल्यापासून, 1979 पासून आर्क्टिकचे तापमान जागतिक सरासरीपेक्षा जवळपास चारपट जास्त वाढले आहे. समुद्रातील बर्फाचे प्रमाण सुमारे 40 टक्क्यांनी घटले आहे आणि सर्वात जुना आणि जाड बर्फ 95 टक्क्यांनी कमी झाला आहे. वैज्ञानिकांनी असा अंदाज लावला आहे की, तापमान वाढत राहिल्यास आर्क्टिकमध्ये 2030 पूर्वी म्हणजेच फक्त पाच वर्षांत बर्फ तेथे नावालाही शिल्लक राहणार नाही. हे संशोधन ‘रियल आइस’ या यूकेआधारित संस्थेचे आहे, ज्यांचे उद्दिष्ट या कमी होत चाललेल्या प्रदेशाचे संरक्षण करणे आहे.
या संशोधनातील प्राथमिक अभ्यासात असे दिसून आले आहे की, बर्फाच्या पृष्ठभागावर फक्त 10 इंच समुद्राचे पाणी टाकल्याने खालून बर्फाची वाढ होते आणि तो आणखी 20 इंच जाड होतो. कारण, पाणी टाकल्याने बर्फावरील इन्सुलेटिंग बर्फाचा थर निघून जातो, ज्यामुळे अधिक पाणी गोठण्यास मदत होते. या प्रक्रियेनंतर बर्फाची जाडी 80 इंचांपर्यंत मोजली गेली, जी आर्क्टिकमधील जुन्या, अनेक वर्षांच्या बर्फाच्या जाडीच्या खालच्या पातळीच्या बरोबरीची आहे.
रियल आईसचे सह-सीईओ अँड्रिया सेकोलिनी म्हणाले, जर हे मोठ्या प्रमाणावर खरे ठरले, तर आम्ही हे दाखवू शकतो की, कमी ऊर्जेचा वापर करूनही आम्ही हिवाळ्यात मोठा फायदा मिळवू शकतो. सेकोलिनी आणि त्यांचे सहकारी सीईओ सियान शेरविन यांचा उद्देश एक ड्रोन विकसित करणे आहे, जे बर्फाची जाडी शोधून आवश्यकतेनुसार पाणी पंप करेल आणि नंतर इंधन भरून दुसर्या ठिकाणी जाईल. या हिवाळ्यात त्यांनी केंब्रिज बेच्या किनार्याजवळ आठ पंपांच्या मदतीने जवळपास अर्धा चौरस मैलाच्या क्षेत्रावर सर्वात मोठी चाचणी केली. आता ते जूनपर्यंत यातील परिणामांची प्रतीक्षा करणार आहेत.