सिंगापूर : संशोधकांना सिंगापूरमध्ये झुरळाची एक नवी प्रजाती सापडली आहे. या प्रजातीचे नाव 'फेरोमोसा' असे ठेवण्यात आले आहे. हे नाव 'पोकेमॉन' या कार्टुन कॅरेक्टरवरून ठेवलेले आहे. या पोकेमॉन कॅरेक्टरला व्हिडीओ गेमच्या सातव्या सीरिजमध्ये पाहिले जाऊ शकते. नैसर्गिक इतिहास संग्रहालयाच्या ली कोंग चियान यांच्या म्हणण्यानुसार हे झुरळ नोक्टिकोलिडे कुळाशी संबंधित आहे. या कुळातील 32 प्रजाती विज्ञानाला माहिती आहेत. आता सिंगापूरमध्ये आढळलेले नव्या प्रजातीचे झुरळ अतिशय नाजूक झुरळांच्या श्रेणीतील आहे.
2016 मध्ये सिंगापुरात कीटकांची विविधता जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्येच या झुरळाचा छडा लागला होता. मात्र, त्याचा एक बाह्य भाग यापूर्वी शोधण्यात आलेल्या झुरळ प्रजातीसारखा असल्याने त्यावर अधिक तपशीलवार संशोधन सुरू होते. त्याच्या अंतर्गत भागांवरून हे सिद्ध झाले की ही झुरळांची आतापर्यंत अज्ञात असलेली प्रजाती आहे. ली कोंग चियान नॅचरल हिस्ट्री म्युझियमच्या फू माओशेंग आणि यूपीएलबी म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीचे क्रिस्टियन लुकानास यांनी याबाबतचा रिसर्च पेपर सादर केला.