वॉशिंग्टन : सन 1929 मध्ये खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांनी एक महत्त्वपूर्ण शोध प्रकाशित केला. आपलं ब्रह्मांड सतत विस्तारत आहे. याच आधारे ‘हबल स्थिरांक‘ तयार झाला, जो ब्रह्मांड किती जलद विस्तारतंय हे दर्शवतो. पण पुढे एक विचित्र समस्या निर्माण झाली, हबल तणाव. ही समस्या म्हणजे ब्रह्मांडाच्या विस्ताराचा दर मोजण्यासाठी वापरलेल्या वेगवेगळ्या पद्धतींमध्ये साधारण 10 टक्क्यांचा फरक आढळतो. यामुळे वैज्ञानिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला.
आता मार्च 2025 मध्ये ‘मंथली नोटिसेस ऑफ द रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार, हा तणाव मिटवण्याचा एक मार्ग म्हणजे ब्रह्मांड स्वतः फिरत असण्याची शक्यता मानणे. या संशोधनानुसार, आपलं ब्रह्मांड दर 500 अब्ज वर्षांनी एक प्रदक्षिणा पूर्ण करतं, म्हणजेच अत्यंत मंदगतीने फिरतंय. हवाई विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ इस्त्वान झापुडी, जे या अभ्यासाचे सहलेखक आहेत त्यांनी सांगितलं की, ‘आजचा सर्वमान्य खगोलशास्त्रीय मॉडेल काही ठिकाणी अडखळतोय; पण ब्रह्मांडाची ही मंदगती फिरणं हबलचा तणाव मिटवू शकते.’ हबल स्थिरांक मोजण्यासाठी वैज्ञानिक दोन मुख्य मार्ग वापरतात : सुपरनोव्हा निरीक्षणे : जेव्हा विशाल तारे स्फोटात मृत्युमुखी पडतात, तेव्हा त्या स्फोटाच्या गतीवरून ब्रह्मांडाचा विस्तार मोजला जातो.
कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड : बिग बँगनंतर 3.8 लाख वर्षांनी तयार झालेल्या किरणोत्सर्गावर आधारित मापन. या दोन पद्धती सुमारे 10 टक्क्यांपर्यंत भिन्न परिणाम देतात, जे वैज्ञानिक द़ृष्टिकोनातून मोठा फरक मानला जातो. ब्रह्मांड फिरतंय ही कल्पना नवीन नाही. 1949 मध्ये गणिततज्ज्ञ कर्ट गोडेल यांनी ही संकल्पना मांडली होती. स्टीफन हॉकिंगसारख्या वैज्ञानिकांनीही यावर विचार मांडले होते. आता या नव्या अभ्यासात ही कल्पना हबल तणावाशी जोडली गेली आहे. लेखकांचे म्हणणे आहे की, ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तू म्हणजे ग्रह, तारे, आकाशगंगा, ब्लॅक होल, सर्व फिरत असताना, ब्रह्मांडही फिरत असेल हे स्वाभाविकच मानावं. जर हा सिद्धांत खरा ठरला, तर तो केवळ हबल तणावाचं उत्तरच नाही, तर ब्रह्मांडाच्या मूलभूत स्वरूपाची नव्याने मांडणी ठरू शकतो.