लंडन : वैद्यकीय क्षेत्रात सध्या चिंतेचा विषय असलेल्या औषधांना दाद न देणाऱ्या (ड्रग रेझिस्टंट) जीवाणूंवर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक नवा मार्ग शोधला आहे. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार, ‘इरिडिअम’ या धातूचे मिश्रण एक अत्यंत आश्वासक आणि नावीन्यपूर्ण प्रतिजैविक (अँटिबायोटिक) असल्याचे समोर आले आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्कमधील अजैविक रसायनशास्त्रज्ञ आणि या अभ्यासाचे मुख्य लेखक अँजेलो फेई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली आहे. संशोधकांनी एका रोबोचा वापर करून धातू आणि सेंद्रिय रेणूंच्या तुकड्यांना एकत्र जोडून अवघ्या एका आठवड्यात 600 हून अधिक रसायनांची ‘लायबरी’ तयार केली. या वेगवान पद्धतीमुळे इरिडिअमव्यतिरिक्त इतर पाच संभाव्य प्रतिजैविकांचा शोध लागला आहे.
सध्या जगभरात औषधांना दाद न देणाऱ्या संसर्गाचे प्रमाण वाढत असताना, ही नवीन पद्धत औषध संशोधनाचा वेग प्रचंड वाढवू शकते. आतापर्यंत प्रतिजैविकांचा शोध प्रामुख्याने सेंद्रिय (कार्बन-आधारित) रेणूंवर केंद्रित होता. मात्र, धातूंच्या मिश्रणांकडे दुर्लक्ष झाले होते. सेंद्रिय रेणू हे रचनेने सपाट असतात, तर धातूयुक्त संयुगे ही त्रिमितीय (थीडी) स्वरूपाची असतात. त्यांच्या या वेगळ्या आकारामुळे त्यांचे रासायनिक आणि जैविक गुणधर्म अधिक प्रभावी ठरतात. संशोधकांनी ही प्रक्रिया कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक स्वयंचलित तंत्रज्ञानाचा वापर केला: रोबोच्या सहाय्याने 192 विविध प्रकारचे ‘लिगँडस्’ (धातूशी जोडले जाणारे सेंद्रिय रेणू) तयार केले गेले.
अझाइडस् आणि अल्काइन्स या दोन पदार्थांना एकत्र जोडून नायट्रोजनयुक्त रिंग्स तयार करण्यासाठी ‘क्लिक केमिस्ट्री’ या प्रभावी प्रक्रियेचा वापर करण्यात आला. या 192 लिगँडस्ना पाच वेगवेगळ्या धातूंसोबत जोडून एकूण 672 धातू संयुगे तयार करण्यात आली. ‘आम्ही ही रसायने बनवण्यासाठी लिक्विड-हँडलिंग रोबो निवडले. कारण, त्यात केवळ ठरावीक प्रमाणात अभिक्रियाकारके (रिजंटस्) मिसळायची होती,’ असे फेई यांनी सांगितले. ही सर्व प्रक्रिया एकाच भांड्यात पार पडली. विशेष म्हणजे, प्रत्येक उत्पादन तयार झाल्यावर लगेचच त्याची जीवाणूंविरुद्धची क्षमता आणि मानवी पेशींवरील सुरक्षितता तपासली गेली, ज्यामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत जाणारा वेळ वाचला.