मॉस्को : रशियन संशोधकांना कॅस्पियन समुद्रात एक नवे बेट आढळून आले आहे. त्यांनी या नवीन भूभागाच्या अस्तित्वाला दुजोरा दिला असून, कॅस्पियन समुद्राच्या उत्तर भागात हे बेट आढळून आले. या बेटाच्या निर्मितीमागे समुद्राच्या पातळीतील घट हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.
रशियन वृत्तसंस्था TASS ने दिलेल्या माहितीनुसार, हे अद्याप नाव नसलेले बेट माली झेम्चुझनी नावाच्या दुसर्या बेटापासून 19 मैल (30 किलोमीटर) नैऋत्य दिशेला आहे. संशोधकांनी भेट दिली तेव्हा हे बेट पाण्याच्या पातळीपेक्षा किंचितच उंच होते. त्याचा पृष्ठभाग दमट हवेचा आणि बहुतांशी सपाट होता; परंतु वाळूच्या लहान टेकड्यांनी तो व्यापलेला होता. शास्त्रज्ञांना नोव्हेंबर 2024 मध्ये उपग्रह छायाचित्रांमध्ये या नवीन बेटाचे पहिले संकेत मिळाले होते. TASS च्या वृत्तानुसार, वाळू आणि गाळाचा एक ढिगारा पाण्याच्या पृष्ठभागावर आला होता आणि तो कोरडा होऊ लागला होता; परंतु नवीन बेट तयार होत असल्याचा दावा काहीसा वादग्रस्त राहिला होता.
नुकत्याच झालेल्या मोहिमेदरम्यान, संशोधकांनी बेटाच्या अस्तित्वाची पुष्टी करण्यासाठी त्याच्याजवळ जाण्यात यश मिळवले; परंतु खराब हवामान आणि उथळ पाण्यामुळे त्यांना बेटावर उतरता आले नाही. ड्रोनद्वारे घेतलेल्या छायाचित्रांवरून बेटाचा आकार आणि त्याची काही वैशिष्ट्ये उघड झाली आहेत; परंतु त्याचे सखोल वर्णन करण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. ‘बेटाला पुढील भेट 2025 च्या उत्तरार्धात नियोजित आहे,’ असे संशोधक पोदोल्याको यांनी सांगितले. त्यानंतर बेटाच्या अधिकृत नावाबाबत निर्णय घेतला जाईल.
रशियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या पी. पी. शिरशोव्ह इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोलॉजी (IO RAS) येथील वरिष्ठ संशोधक स्टीफन पोदोल्याको, जे या मोहिमेत सहभागी होते, त्यांनी म्हटले आहे की, ‘कॅस्पियन समुद्राच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे हे नवीन बेट समुद्रातून उदयास आले आहे.’ युरोप आणि आशियाच्या सीमेवर असलेला कॅस्पियन समुद्र हा पृष्ठफळानुसार (143,200 चौरस मैल किंवा 371,000 चौरस किलोमीटर) जगातील सर्वात मोठा भूवेष्टीत जलाशय आहे. पोदोल्याको यांनी स्पष्ट केले की, ‘कॅस्पियन समुद्रात नवीन बेटांची निर्मिती ही या भूवेष्टीत पाण्याच्या पातळीतील दीर्घकालीन चढ-उतारांच्या चक्रीय प्रक्रियेशी संबंधित आहे. समुद्राची पातळी खाली जाते, तेव्हा समुद्राच्या तळावरील उंचवटे पृष्ठभागावर येतात आणि बेटांची निर्मिती होते.’ कॅस्पियन समुद्राची पातळी 1930 आणि 1970 च्या दशकात कमी झाली होती, त्यानंतर ती पुन्हा वाढली आणि 2010 च्या सुमारास पुन्हा कमी होऊ लागली, असे पोदोल्याको म्हणाले. या अलीकडील घटीसाठी हवामान बदल जबाबदार असू शकतो, कारण कॅस्पियन समुद्राची पाण्याची पातळी काहीअंशी बाष्पीभवनाच्या दरावर अवलंबून असते. तसेच, समुद्राच्या खाली होणार्या भूगर्भीय हालचालींमुळे देखील पाण्याच्या पातळीत बदल होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.