झुरिच : रक्तातील अतिरिक्त साखर काढून टाकणाऱ्या एका प्रायोगिक मेडिकल इम्प्लांटने प्रयोगशाळेतील उंदरांवर केलेल्या चाचण्यांमध्ये मधुमेह आणि लठ्ठपणावर उपचार करण्यात मोठे यश मिळवले आहे. रिअल-टाईममध्ये रक्तातील साखरेच्या पातळीचा मागोवा घेणाऱ्या ‘कंटीन्यूअस ग्लुकोज मॉनिटर’सोबत जोडलेले हे अत्यंत लहान उपकरण, रुग्णाच्या गरजेनुसार रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी डिझाईन केले गेले आहे. हे उपकरण विजेवर चालणाऱ्या रासायनिक अभिक्रियेद्वारे हे कार्य करते. उंदरांवर केलेल्या प्रयोगांमध्ये या उपकरणाने रक्तातील इन्सुलिनची अचानक होणारी वाढ रोखली आणि चरबी कमी करण्यास मदत केली.
‘सायन्स’ या जर्नलमध्ये २२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या या इम्प्लांटबद्दल माहिती देताना, ईटीएच ज्युरीचमधील जैवतंत्रज्ञान आणि बायोइंजिनिअरिंगचे प्राध्यापक आणि या अभ्यासाचे सह-लेखक मार्टिन फुसेनेगर यांनी सांगितले की, हे उपकरण मधुमेह आणि लठ्ठपणावर उपचार करण्याचा एक पूर्णपणे नवीन मार्ग देऊ शकते. त्यांचा संघ आता हे उपकरण इतर प्रयोगशाळेतील प्राण्यांवर आणि शेवटी मानवांवर चाचणी करण्याच्या दिशेने काम करत आहे. जगभरात सुमारे ७९० दशलक्ष लोकांना टाईप २ मधुमेह आहे आणि १ अब्जांहून अधिक लोकांना लठ्ठपणाचा त्रास आहे. लठ्ठपणा असलेल्या लोकांमध्ये अनेकदा ‘इन्सुलिन प्रतिरोधकता’ असते, ज्यामध्ये शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत आणि रक्तामधून त्यांना हवी असलेली साखर शोषून घेऊ शकत नाहीत.
सुरुवातीला शरीर याची भरपाई करण्यासाठी अधिक इन्सुलिन तयार करते; परंतु शेवटी शरीर ते सांभाळू शकत नाही. यामुळे प्रीडायबेटिस आणि टाईप २ मधुमेहाची सुरुवात होते. टाईप २ मधुमेह असलेल्या सुमारे ९० टक्के लोकांना लठ्ठपणा किंवा अतिजादा वजन असते. याचवेळी, यकृतामधील रासायनिक प्रक्रिया रक्तातील अतिरिक्त ग्लुकोजचे रूपांतर चरबीमध्ये करतात, ज्यामुळे वजन वाढण्यास आणखी भर पडते. या परिस्थितीवरील सध्याच्या उपचारांमध्ये प्रामुख्याने जीवनशैलीतील बदल (जसे की आहार आणि व्यायाम) किंवा दीर्घकालीन औषधे समाविष्ट आहेत.
जसे की रक्तातील साखर कमी करणारे ‘मेटफॉर्मिन’ आणि वजन कमी करण्यासाठी भूक नियंत्रित करणारे ‘जीएलपी-१’ (GLP-1s) औषध. परंतु, फुसेनेगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना प्रश्न पडला की, आपण थेट ग्लुकोजलाच लक्ष्य करू शकतो का? त्यांनी एक इंच लांबीचा ‘रिॲक्टर’ तयार केला आहे, जो अत्यंत कमी प्रमाणात निर्माण होणाऱ्या विजेद्वारे ट्रिगर केलेल्या नियंत्रित रासायनिक अभिक्रियेद्वारे ग्लुकोजचे रूपांतर ‘ग्लूकोनेट’ नावाच्या निरुपद्रवी उप-उत्पादनात करतो. हे रूपांतर एका इलेक्ट्रोडवर होते, ज्यावर सोने आणि प्लॅटिनमचे नॅनोपार्टिकल्स लेपलेले असतात आणि ते ग्रेफाईट फेल्टमध्ये बसवलेले असतात.