वॉशिंग्टन ः युनिट्री या कंपनीने त्यांच्या ह्युमनॉईड म्हणजेच मानवाकृती रोबोचा एक नवा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर केला आहे, ज्यामध्ये हा रोबो अवघड साईड फ्लिप करताना दिसतो. या व्हिडीओत सिल्व्हर-ग्रे रंगाचा ‘जी 1’ हा रोबो थोडा खाली बसतो आणि नंतर एका सुलभ हालचालीत हवेत बाजूने फिरत उडी मारतो.
हा रोबो मुख्यतः आपल्या डाव्या पायावर तोल सांभाळत सुरक्षितरीत्या जमिनीवर उतरतो आणि दुसर्या पायाच्या मदतीने स्थिर राहतो. साईड फ्लिप पूर्ण वेगात पाहणे जरी थक्क करणारे असले, तरी संथ गतीत (स्लो मोशन) हे द़ृश्य आणखीनच प्रभावी वाटते. विशेषतः, लँडिंगनंतर रोबो ज्या सहजतेने स्वतःला संतुलित करतो, ते पाहण्यासारखे आहे. गेल्या वर्षी हाच मॉडेल बॅकफ्लिप करण्यात यशस्वी झाला होता. ‘जी 1’ला ही नवीन कसरत शिकवण्यासाठी कंपनीने प्रामुख्याने त्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अल्गोरिदममध्ये सुधारणा केली, ज्यामुळे त्याचा सॉफ्टवेअर प्रतिसाद अधिक वेगवान आणि अचूक झाला, असे युनिट्रीच्या प्रतिनिधींनी सांगितले. ‘साईड फ्लिप रिइनफोर्समेंट लर्निंग प्रशिक्षणाखाली विकसित करण्यात आला,’ असे कंपनीने स्पष्ट केले. रिइनफोर्समेंट लर्निंग ही एक प्रसिद्ध तंत्रज्ञान प्रक्रिया आहे, ज्याच्या मदतीने रोबोटस्ना त्यांच्या शारीरिक हालचाली आणि परस्परसंवाद शिकवले जातात. याच तंत्रज्ञानाचा वापर ‘फिगर’ या कंपनीने त्यांच्या ‘फिगर 02’ रोबोसाठी केला आहे, जे अधिक मानवीय हालचाली करू शकतात. ‘जी 1’ केवळ अॅक्रोबॅटिक्ससाठीच सक्षम नाही, तर त्याने मार्शल आर्टच्या एका प्रात्यक्षिकातही चमक दाखवली आहे.
या सत्रात त्याने एका दांडक्याने हल्ला करणार्या विरोधकाचे शस्त्र हिसकावून घेतले. हातांच्या काही बनावट हालचाली करून ‘जी1’ ने एका वेगवान गोल फिरक्या किकने ( spinning kick) दांडका दूर फेकला. ‘जी 1’चे विशेषत: हलके आणि कॉम्पॅक्ट डिझाईन त्याला सुलभ हालचाली करण्यास मदत करते. हा रोबो सुमारे 1.3 मीटर (4.3 फूट) उंच असून, त्याचे वजन केवळ 35 किलो (77 पौंड) आहे. यामध्ये 3 डी लिडार आणि डेप्थ कॅमेरा बसवलेले आहेत, ज्यामुळे रोबोला त्याच्या सभोवतालचे 360-डिग्री द़ृश्य मिळते. त्याच्या हालचाली सहज आणि अचूक बनवणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याचे 23 डिग्री ऑफ फ्रीडम (संयुक्त व हालचालींसाठी असलेले स्वतंत्र अक्ष). याशिवाय, ‘जी 1’ 2 मीटर प्रतिसेकंद (4.5 मैल प्रतितास किंवा 7.2 किलोमीटर प्रतितास) वेगाने चालू आणि धावू शकतो.