Alzheimer treatment research | अल्झायमरवर उपचाराची नवी आशा 
विश्वसंचार

Alzheimer treatment research | अल्झायमरवर उपचाराची नवी आशा

मेंदूचे सूक्ष्म इंजिन रिचार्ज करून शास्त्रज्ञांनी दूर केला स्मृतिभ्रंश!

पुढारी वृत्तसेवा

पॅरिस : वैद्यकीय क्षेत्रात अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशासारख्या गंभीर आजारांवर अत्यंत क्रांतिकारी संशोधन समोर आले आहे. फ्रेंच वैद्यकीय संशोधन संस्था इन्सरम, युनिव्हर्सिटी ऑफ बोर्डो आणि कॅनडाच्या युनिव्हर्सिटी ऑफ मॉन्कटन यांच्या शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच मेंदूतील पेशींच्या ऊर्जेचे कारखाने म्हणजेच मायटोकॉन्ड्रियामधील बिघाडामुळे स्मृतिभ्रंश होतो, हे सिद्ध केले आहे.

इतकेच नव्हे, तर शास्त्रज्ञांनी एक नवीन तंत्रज्ञान वापरून हे सूक्ष्म इंजिन तात्पुरते रिचार्ज केले, ज्याने स्मृतिभ्रंश झालेल्या उंदरांची स्मरणशक्ती पूर्णपणे पूर्ववत करण्यात यश आले आहे. प्रसिद्ध नेचर न्यूरोसायन्सया नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. मायटोकॉन्ड्रिया हे पेशींचे पॉवर हाऊस मानले जाते. आपला मेंदू शरीरातील सर्वात जास्त ऊर्जा वापरतो. मेंदूतील न्यूरॉन्स एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी, विचार करण्यासाठी आणि आठवणी साठवण्यासाठी याच ऊर्जेचा वापर करतात.

जेव्हा मायटोकॉन्ड्रियाचे काम मंदावते, तेव्हा न्यूरॉन्सना पुरेशी ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे मेंदूच्या पेशी कमकुवत होतात आणि माणसाची विचार करण्याची व लक्षात ठेवण्याची क्षमता नष्ट होऊ लागते. आतापर्यंत शास्त्रज्ञांचा असा समज होता की, अल्झायमर आजार बळावल्यानंतर मेंदूच्या पेशी मरतात आणि त्यामुळे मायटोकॉन्ड्रिया निकामी होतो. मात्र, या नवीन संशोधनाने सिद्ध केले आहे की, पेशी मरण्यापूर्वीच मायटोकॉन्ड्रियामध्ये बिघाड होतो, म्हणजेच ऊर्जा निकामी होणे हेच स्मृतिभ्रंशाचे मूळ कारण असू शकते.

शास्त्रज्ञांनी उंदरांवर प्रयोग करण्यासाठी मायटोड्रॅड जीएस नावाचे एक कृत्रिम रिसेप्टर तयार केले. हे रिसेप्टर मायटोकॉन्ड्रियाच्या आत असणार्‍या जी प्रोटीन्सला थेट उत्तेजित करते. जेव्हा स्मृतिभ्रंश झालेल्या उंदरांच्या मेंदूत हे तंत्रज्ञान सक्रिय केले, तेव्हा त्यांच्या मायटोकॉन्ड्रियाची कार्यक्षमता पुन्हा सामान्य पातळीवर आली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ऊर्जा मिळताच उंदरांच्या स्मरणशक्तीमध्ये सुधारणा झाली आणि ते गोष्टी पुन्हा लक्षात ठेवू लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT