10,000 पावलांचा नियम विसरा! फिटनेससाठी आलाय जपानचा नवा फंडा 
विश्वसंचार

Japanese interval walking |10,000 पावलांचा नियम विसरा! फिटनेससाठी आलाय जपानचा नवा फंडा

फक्त ३० मिनिटांच्या 'इंटरव्हल वॉकिंग'ने मिळवा आश्चर्यकारक फायदे

पुढारी वृत्तसेवा

टोकियो : वजन कमी करण्यासाठी आणि फिटनेसचे ध्येय गाठण्यासाठी दररोज 10,000 पावले चालणे हा एक ‘सुवर्ण नियम’ मानला जातो. पण, आता जपानमधील एका नवीन वॉकिंग तंत्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, जे कमी वेळेत अधिक प्रभावी परिणाम देण्याचा दावा करते. याला ‘जपानी इंटरव्हल वॉकिंग’ असे म्हणतात. ही पद्धत अत्यंत सोपी असूनही आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरत आहे.

‘जपानी इंटरव्हल वॉकिंग’ म्हणजे काय?

‘जपानी इंटरव्हल वॉकिंग’ ही पद्धत अतिशय सरळ आहे. यात तुम्हाला एकूण 30 मिनिटे चालायचे आहे; पण एका विशिष्ट पद्धतीने. 3 मिनिटे वेगाने चाला : तुमचा चालण्याचा वेग इतका असावा की, तुम्हाला बोलताना धाप लागेल किंवा मोठी वाक्ये बोलता येणार नाहीत.

3 मिनिटे हळू चाला : त्यानंतरचा वेग इतका कमी करा की, तुमच्या श्वासाची गती पुन्हा सामान्य होईल आणि तुम्हाला पूर्णपणे आराम मिळेल. हा 3 मिनिटे वेगवान आणि 3 मिनिटे हळू चालण्याचा क्रम 30 मिनिटांसाठी 5 वेळा पुनरावृत्त म्हणजेच पुन्हा पुन्हा करायचा आहे.

तज्ज्ञ आणि संशोधन काय सांगतात?

जपानमधील शास्त्रज्ञांनी 20 वर्षांपूर्वीच या पद्धतीवर संशोधन सुरू केले होते, विशेषतः मध्यमवयीन आणि वृद्ध लोकांसाठी. या संशोधनातून अनेक आश्चर्यकारक फायदे समोर आले आहेत. एका अभ्यासात असे दिसून आले की, जे लोक आठवड्यातून चार किंवा अधिक दिवस इंटरव्हल वॉकिंग करतात, त्यांची एरोबिक क्षमता (शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्वाचे लक्षण) लक्षणीयरीत्या सुधारते. या पद्धतीने चालण्यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. या व्यायामाने चार ते सहा महिन्यांत लोकांचे 3 ते 5 किलो वजन कमी होते, ज्यात प्रामुख्याने शरीरातील चरबीचा समावेश असतो. धावण्यामुळे सांध्यांवर ताण येतो; पण इंटरव्हल वॉकिंग हा कमी त्रासाचा आणि अधिक सुरक्षित पर्याय आहे. हे तंत्र ‘हाय-इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग’ प्रमाणेच काम करते, जिथे कमी वेळेत शरीराला अधिक फायदे मिळतात. शरीराला सतत वेग बदलण्याची सवय लावावी लागते, ज्यामुळे चयापचय क्रियेला चालना मिळते.

कोणासाठी आहे हा सर्वोत्तम पर्याय?

ज्या लोकांना दररोज 10,000 पावले चालणे कंटाळवाणे किंवा अशक्य वाटते, त्यांच्यासाठी ‘जपानी इंटरव्हल वॉकिंग’ एक उत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्हाला फक्त अर्धा तास वेळ, कोणत्याही जिम किंवा महागड्या उपकरणांशिवाय फक्त चालण्याची इच्छाशक्ती हवी आहे. ज्यांना धावण्याचा व्यायाम टाळायचा आहे, विशेषतः मध्यमवयीन आणि वृद्ध व्यक्तींसाठी हा एक प्रभावी आणि सुरक्षित व्यायाम प्रकार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT