वॉशिंग्टन : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वापरले जाणारे ‘इव्होलुकुमॅब’ हे औषध मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करू शकते, असा दावा एका नवीन संशोधनात करण्यात आला आहे. ‘मास जनरल बि—घम’ या संस्थेच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
हृदयविकारतज्ज्ञ आणि या अभ्यासाचे लेखक डॉ. ए. मार्स्टन यांच्या मते, गेल्या दशकापासून कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधे प्रामुख्याने अशाच रुग्णांना दिली जात होती, ज्यांना आधीच हृदयविकाराचा त्रास झाला आहे. मात्र, आता नवीन संशोधनानुसार, जर सुरुवातीच्या टप्प्यातच औषधांच्या मदतीने कोलेस्ट्रॉल नियंत्रित केले, तर भविष्यातील स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी करता येऊ शकतो. रक्तामध्ये जेव्हा LDL (Low- Density Lipoprotein) म्हणजेच ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ वाढते, तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये ‘प्लाक’ (एक प्रकारचा थर) जमा होऊ लागतो. हा थर हळूहळू रक्ताभिसरणात अडथळा निर्माण करतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.
‘इव्होलुकुमॅब’ हे औषध नसांमध्ये प्लाक जमा होण्यापासून रोखते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुरक्षित राहते. संशोधनातील महत्त्वाचे मुद्दे : बॅड कोलेस्ट्रॉलमध्ये घट : हे औषध ‘ PCSK9 इनहिबिटर्स’ या गटातील असून, यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल 60 टक्क्यांपर्यंत कमी केले जाऊ शकते. अभ्यासाची व्याप्ती: ‘VESALIUS- CV Trial’ अंतर्गत केलेल्या या अभ्यासात 3,655 लोकांचा समावेश होता. हाय रिस्क मधुमेह : यात अशा रुग्णांचा समावेश होता, ज्यांना 10 वर्षांपासून मधुमेह आहे किंवा ज्यांना दररोज इन्सुलिन घ्यावे लागते. अशा उच्च जोखमीच्या रुग्णांमध्ये हे औषध अत्यंत प्रभावी ठरले आहे.