Alzheimer’s Disease Treatment | मेंदूच्या अल्झायमर आजारावरील उपचारांसाठी नवी दिशा Alzheimer’s Disease Treatment |
विश्वसंचार

Alzheimer’s Disease Treatment | मेंदूच्या अल्झायमर आजारावरील उपचारांसाठी नवी दिशा

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अल्झायमरसारख्या गंभीर आजारामुळे नष्ट होणाऱ्या चेतापेशी (न्युरॉन्स) पुन्हा निर्माण करण्याचा एक नवा मार्ग वैज्ञानिकांनी शोधून काढला आहे. ‘सेल बायोमटेरियल्स’ या नियतकालिकात २६ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या एका नव्या प्रयोगशाळा अभ्यासातून ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. मानवी मेंदूतील ‘ॲस्ट्रोसाईटस्‌’ नावाच्या दुसऱ्या प्रकारच्या पेशींमधील एका विशिष्ट प्रथिनाचे प्रमाण कमी केल्यास, त्या पेशींचे न्युरॉन्समध्ये रूपांतर होऊ शकते, असे या संशोधनातून दिसून आले आहे. प्रौढ मानवी मेंदूत स्वतःहून नवीन न्युरॉन्स तयार करण्याची क्षमता अतिशय मर्यादित असते, तर आजारपणामुळे नष्ट झालेले न्युरॉन्स पुनरुज्जीवित करण्याची क्षमता त्याहूनही कमी असते. आता एका जेलच्या साहाय्याने नव्या चेतापेशी किंवा न्युरॉन्स बनवता येऊ शकतात, असे संशोधकांना प्रयोगातून दिसून आले आहे.

ॲस्ट्रोसाईटस्‌ या मेंदूतील ताऱ्यांच्या आकाराच्या पेशी असून त्या न्युरॉन्सचे संरक्षण आणि त्यांना सहकार्य करण्याचे काम करतात. ॲस्ट्रोसाईटस्‌च्‍या विकासासाठी PTBP1 नावाचे प्रथिन अत्यंत महत्त्वाचे असते. या प्रथिनाचा लोप केल्यास ॲस्ट्रोसाईटस्‌चे न्युरॉन्समध्ये रूपांतर होऊ शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे. ही पद्धत मानवी उपचारात यशस्वी ठरल्यास नष्ट झालेले न्युरॉन्स पुन्हा मिळवून मेंदूचे कार्य पूर्ववत करणे शक्य होईल. यापूर्वी उंदरांच्या मेंदूतील PTBP1 प्रथिनाशी संबंधित जनुक हटवून ॲस्ट्रोसाईटस्‌चे न्युरॉन्समध्ये रूपांतर करण्यात आले होते. मात्र, नंतरच्या प्रयोगांमध्ये या निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

हा विरोधाभास दूर करण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅरोलिनातील औषधशास्त्रज्ञ पेईशेंग शू आणि त्यांच्या टीमने ‘नॅनो-इरेजर’ या तंत्रज्ञानाचा वापर केला. या तंत्रज्ञानाद्वारे जनुक बदल न करता, PTBP1 प्रथिनाला लक्ष्य करणारे अँटिबॉडी एका पॉलिमर जेलमध्ये समाविष्ट करण्यात आले. या जेलमुळे अँटिबॉडीला ‘ब्लड-ब्रेन बॅरियर’ (रक्त आणि मेंदूमधील अडथळा) पार करून ॲस्ट्रोसाईटस्‌पर्यंत पोहोचणे शक्य झाले. तेथे पोहोचल्यानंतर अँटिबॉडी PTBP1 प्रथिनाला बांधून ठेवते आणि पेशींच्या अंतर्गत यंत्रणेद्वारे ते प्रथिन नष्ट करते. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या न्यूरोसायंटिस्ट डॉ. क्रिस्टियन रॅन यांनी या प्रयोगाचे स्वागत केले आहे. ‘हे अतिशय मनोरंजक आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आहे.

हे जेल ब्लड-ब्रेन बॅरियर सहज ओलांडू शकते हे त्यांनी सिद्ध केले असून मेंदूशी संबंधित उपचारांच्या विकासासाठी ही अत्यंत महत्त्वाची पायरी आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. संशोधक पथकाने सर्वप्रथम प्रयोगशाळेतील डिशमध्ये वाढवलेल्या मानवी ॲस्ट्रोसाईटस्‌वर या जेलची चाचणी घेतली. काही दिवसांच्या कालावधीत, जेलच्या संपर्कात आलेल्या ॲस्ट्रोसाईटस्‌चा मूळ ताऱ्यासारखा आकार बदलू लागला आणि त्यांच्यामध्ये अक्षतंतू (Axons - ज्या तंतूंद्वारे न्युरॉन्स संदेश पाठवतात) तयार होण्यास सुरुवात झाली. याशिवाय, सामान्यतः न्युरॉन्समध्ये आढळणारी प्रथिनेही या ॲस्ट्रोसाईटस्‌मध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT