विश्वसंचार

‘ग्रीन’ हायड्रोजन मिळवण्यासाठी नवा उत्प्रेरक

Arun Patil

नवी दिल्ली : जग सध्या जीवाश्म इंधनाला अधिकाधिक पर्याय शोधू लागले आहे. अशा वेळी हायड्रोजन वायू हा स्वच्छ ऊर्जेचा एक उत्तम स्रोत बनून समोर आलेला आहे. आयआयटी गुवाहाटीमधील संशोधकांनी आता एक असा उत्प्रेरक (कॅटॅलिस्ट) विकसित केला आहे जो कार्बन डायऑक्साईडची निर्मिती केल्याशिवायच वूड अल्कोहोलपासून हायड्रोजनची निर्मिती करू शकतो.

हायड्रोजनचे उत्पादन हे एक तर पाण्याच्या विद्युत रासायनिक विभाजनातून होते किंवा अल्कोहोलसारख्या जैव-व्युत्पन्न रसायनांपासून केले जाते. नव्या प्रक्रियेत मेथनॉल-रिफॉर्मिंग नावाच्या प्रक्रियेत उत्प्रेरकाचा उपयोग करून मिथाईल अल्कोहोल (वूड अल्कोहोल) पासून हायड्रोजनचे उत्पादन केले जाते. वूड अल्कोहोलपासून हायड्रोजनच्या उत्पादनामध्ये दोन समस्या होत्या.

पहिली समस्या अशी होती की या प्रक्रियेत 300 अंश सेल्सिअसपर्यंतचे उच्च तापमान आणि उच्च दाब यांची गरज होती. दुसर्‍या समस्येत, या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईडची सह-उत्पादन म्हणून निर्मिती होत होती. हा एक ग्रीनहाऊस गॅस असून तो प्रदूषणकारी आहे. आता संशोधकांच्या टीमने या समस्यांचा उपाय शोधला आहे. त्यांनी विकसित केलेली नवी पद्धत ही सोपी तर आहेच, शिवाय पर्यावरणाच्या द़ृष्टीनेही सुरक्षित आहे.

या प्रक्रियेत फॉर्मिक अ‍ॅसिडचीही निर्मिती होते. ते एक मौल्यवान औद्योगिक रसायन आहे. हे संशोधन मेथॅनॉलला भावी 'लिक्विड ऑर्गेनिक हायड्रोजन कॅरिअर' (एलओएचसी) च्या रूपात सादर करते. त्यामुळे हायड्रोजन-मेथॅनॉल अर्थव्यवस्थेच्या विकासाचे नवे दालन खुले करू शकते. संशोधकांनी उत्प्रेरकाचे एक विशेष रूप विकसित केले आहे ज्याला 'पिन्सर' उत्प्रेरक म्हटले जाते. त्यामध्ये एक केंद्रीय धातू आणि काही विशिष्ट कार्बनिक लिगेंड असतात. हे कार्बनिक लिगेंड खेकड्याच्या पंज्यांसारखे असतात जे धातूला एका ठिकाणी स्थिर ठेवतात. या अनोख्या व्यवस्थेमुळे उत्प्रेरक अतिशय परिणामकारक बनते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT