Cat Species 
विश्वसंचार

Cat Species : एका शतकानंतर मांजराच्या नवीन प्रजातीचा शोध!

आकाराने पाळीव मांजरापेक्षाही लहान

पुढारी वृत्तसेवा

लंडन : जनुकीय विश्लेषणाच्या साहाय्याने शास्त्रज्ञांनी मांजराच्या एका नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. गेल्या एका शतकात अशा प्रकारच्या नवीन मांजर प्रजातीची ओळख पटण्याची ही पहिलीच वेळ आहे. या शोधामुळे मांजरांच्या कुळातील अनेक वर्षांपासून चाललेला वाद मिटला आहे. ‘लियोपार्डस टिल्कायो’ (Leopardus tilcayo) असे या नवीन प्रजातीचे नाव असून ती लहान, ठिपके असलेल्या रानमांजरांच्या प्रजातीतील आहे. ही मांजर बोलिव्हियातील ‘युंगास’ ढगाळ जंगलांमध्ये आढळते. याशिवाय, पेरू देशामध्ये आढळणाऱ्या टायगर कॅटच्या एका उपप्रजातीचाही (Leopardus tigrinus antisuyo) या अभ्यासात शोध लागला आहे.

यापूर्वी या मांजराला ‘नॉर्दर्न टायगर कॅट’ मानले जात होते. मात्र, नवीन अभ्यासानुसार ही प्रजाती सुमारे १४ लाख वर्षांपूर्वीच इतर प्रजातींपासून वेगळी झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. १९२३ मध्ये उरुग्वेयन पांपास मांजराचा (Leopardus fasciatus) शोध लागल्यानंतर, एका शतकात प्रथमच जिवंत मांजराच्या नवीन प्रजातीची नोंद झाली आहे. स्थानिक लोक या मांजराला ‘‘टिल्कायो’’ म्हणतात, त्यावरूनच याचे नाव देण्यात आले आहे. या नवीन प्रजातीचे वजन अवघे १.५ ते २ किलोग्रॅम (३ ते ४ पाउंड) असून तिची लांबी शेपटीशिवाय सुमारे ५० सेमी (२० इंच) आहे. तिची शेपूट २५ सेमी (१० इंच) लांब असते. ‘‘ही मांजर आपल्या घरातील नेहमीच्या पाळीव मांजरापेक्षाही लहान आहे. बोलिव्हियातील वन्यजीव आश्रमात ‘टिग्रिनो’ नावाचा असाच एक नर मांजर १० वर्षांपूर्वी आला होता. तो इतर मांजरांपेक्षा वेगळा दिसत होता, पण ती एक संपूर्ण नवीन प्रजाती असेल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती,’’ असे अभ्यासाच्या सहलेखिका आणि जीवशास्त्रज्ञ पाओला नोगालेस-अस्कारुंझ यांनी सांगितले. १७७५ मध्ये फ्रेंच गियानामध्ये पहिल्यांदा ‘टायगर कॅट’ची नोंद झाली होती. त्यानंतर १८ व्या आणि १९ व्या शतकात अनेक युरोपीय शास्त्रज्ञांना दक्षिण अमेरिकेत वेगवेगळ्या टायगर कॅट्स आढळल्या होत्या. नवीन जनुकीय विश्लेषणामुळे आता या मांजरांच्या वर्गीकरणाचा गुंता सुटला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT