Cleanest lake File Photo
विश्वसंचार

Cleanest lake: जगातील सर्वात स्वच्छ सरोवराला पर्यटकांकडून धोका!

न्यूझीलंडच्या जंगलांमध्ये लपलेले एक छोटेसे सरोवर सध्या चर्चेत आहे. त्याचे नाव आहे ब्लू लेक अर्थात ‌‘रोटोमायरेवेनुआ‌’

पुढारी वृत्तसेवा

वेलिंग्टन : न्यूझीलंडच्या जंगलांमध्ये लपलेले एक छोटेसे सरोवर सध्या चर्चेत आहे. त्याचे नाव आहे ब्लू लेक अर्थात ‌‘रोटोमायरेवेनुआ‌’. वैज्ञानिकांच्या मते, हे जगातील सर्वात स्वच्छ गोड्या पाण्याचे सरोवर आहे.जवळपास दहा वर्षांपूर्वी वैज्ञानिकांना आढळून आले होते की, या सरोवराचे पाणी इतके स्वच्छ आहे की, त्यामध्ये 70-80 मीटर खालपर्यंत स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते. पाण्याच्या याच अविश्वसनीय शुद्धतेमुळे हे सरोवर जगभरात प्रसिद्ध झाले. आता मात्र या सरोवरासाठी पर्यटकच धोका बनले आहेत. परिस्थिती अशी आहे की, येथील स्थानिक माओरी जमात आणि संवर्धन अधिकारी पर्यटकांना त्यांचे बूट स्वच्छ करण्याची आणि पाण्याला स्पर्श न करण्याची विनंती करत आहेत, जेणेकरून या पवित्र जागेचे रक्षण करता येईल.

स्थानिक माओरी जमात ‌‘न्गाती अपा‌’ यांच्यासाठी हे सरोवर शतकानुशतके पवित्र आहे. पूर्वी येथे मृत लोकांची हाडे धुतली जात होती, जेणेकरून त्यांच्या आत्म्याला स्वर्ग प्राप्त होईल. आजही माओरी लोक या पाण्याला ‌‘तापु‌’ म्हणजे स्पर्श करण्यास मनाई मानतात. 2013 मध्ये जेव्हा हे सरोवर जगातील सर्वात स्वच्छ सरोवर असल्याची बातमी आली, तेव्हा त्याचे फोटो इन्स्टाग््रााम आणि फेसबुकवर व्हायरल झाले.

दरवर्षी हजारो लोक पायपीट करत या सरोवराजवळ पोहोचू लागले. सीएनएनच्या अहवालानुसार, ‌‘सोशल मीडियामुळे हे ठिकाण खूप लोकप्रिय झाले.‌‘या ब्लू लेकच्या खालील सरोवरांमध्ये ‌‘लिंडाविया‌’ नावाचे विदेशी शेवाळ पसरले आहे. लोक त्याला ‌‘लेक स्नॉट‌’ म्हणतात. कारण, ते चिकट चिखल तयार करते. हे शेवाळ पर्यटकांचे बूट, बाटल्या किंवा इतर सामानाद्वारे वरच्या ब्लू लेकपर्यंत पोहोचू शकते. त्याचा फक्त एक कण जरी ब्लू लेकच्या स्वच्छ पाण्यात आला, तरी ते पाणी कायमचे गढूळ होईल. यामुळे आता रस्त्यामध्ये क्लीनिंग स्टेशन बनवले आहेत, जिथे बूट, बॅग आणि इतर साहित्य स्वच्छ करणे अनिवार्य आहे.

सरोवराच्या पाण्याला हात लावण्यास सक्त मनाई आहे. येथे पोहणे किंवा फोटो काढण्यासाठी कॅमेरा पाण्यात बुडवणेही कठोरपणे निषिद्ध आहे. उन्हाळ्यामध्ये सरोवराच्या किनाऱ्यावर माओरी किंवा सरकारी वार्डन तैनात असतात. बोर्डावर स्पष्टपणे लिहिले आहे: ‌‘हे पाणी पवित्र आहे, स्पर्श करण्यास मनाई आहे.‌’ माओरी नेत्या जेन स्किल्टन यांनी सीएनएनला सांगितले, ‌‘हे सरोवर आमच्यासाठी केवळ पाणी नाही, तर आमची ओळख आणि आत्मा आहे. एक चूक झाली तर सर्वकाही संपेल.‌’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT