AI Speech Analysis | तुमचा आवाज सांगणार तुमचे वय किती वेगाने वाढतंय! 
विश्वसंचार

AI Speech Analysis | तुमचा आवाज सांगणार तुमचे वय किती वेगाने वाढतंय!

नव्या एआय ‘स्पीच क्लॉक’चा दावा

पुढारी वृत्तसेवा

लंडन : एका नव्या अभ्यासानुसार, संभाषण आणि बोलण्याच्या पद्धतीचे विश्लेषण करणारे नवीन एआय टूल वापरकर्त्यांचे वय कसे वाढत आहे आणि त्यांना डिमेन्शियाचा (स्मृतिभ्रंश) धोका आहे का, याची माहिती देऊ शकते. हे टूल शेकडो भाषा आणि वक्तृत्व पद्धतींचे विश्लेषण करून व्यक्तीच्या बोलण्याच्या ढबीवरून त्यांचे कालानुक्रमे वय (Chronological Age) किती असावे, याचा अंदाज लावते. स्पॅनिश बोलणाऱ्या सुमारे ३,००० प्रौढांवर केलेल्या या अभ्यासात असे आढळून आले की, ज्यांचे एआयने अंदाजित केलेले वय त्यांच्या प्रत्यक्ष वयापेक्षा जास्त होते, त्यांच्यामध्ये बौद्धिक समस्या, डिमेन्शिया आणि जलद जैविक वृद्धत्वाची (Accelerated Biological Aging) लक्षणे दिसण्याची शक्यता जास्त होती. तसेच अशा व्यक्तींची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती इतर सहभागींच्या तुलनेत कमी अनुकूल असल्याचे संशोधकांनी ३० सप्टेंबरला ‘सायन्स ॲडव्हान्सेस’ या मासिकात प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

आवाजाचे विश्लेषण करणारे हे टूल इतर ‘एजिंग क्लॉक्स’प्रमाणेच कार्य करते, जे वयाशी संबंधित आजारांच्या जोखमीचा अंदाज घेण्यासाठी विविध जैविक घटकांचा वापर करतात. अर्जेंटिनामधील युनिव्हर्सिटी ऑफ सॅन अँड्रेस येथील ‘कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्स सेंटर’चे संचालक आणि या अभ्यासाचे सह-लेखक अडॉल्फो गार्शिया यांनी सांगितले, ‘सध्या अस्तित्वात असलेली एजिंग क्लॉक्स खूप प्रभावी आहेत; परंतु त्यातील अनेक साधने मेंदूच्या स्कॅन किंवा रक्तचाचण्यांवर अवलंबून असतात, ज्या महागड्या, त्रासदायक आणि नियमितपणे करणे कठीण असतात. मात्र, आवाजाच्या वापरामुळे या सर्व मर्यादांवर सहज मात करता येऊ शकते.’ तथापि, वैयक्तिक रुग्णांमधील डिमेन्शियाच्या जोखमीचे मूल्यमापन करण्यासाठी या पद्धतीचा वापर करण्यापूर्वी, वेगवेगळ्या भाषांमध्ये आणि दीर्घकाळ चाचण्या घेणे आवश्यक असल्याचे एका तज्ज्ञाने सांगितले.

संशोधकांनी लॅटिन अमेरिकेतील डिमेन्शिया संशोधन प्रकल्प ‘ReD-Lat’च्या डेटाचा वापर केला. या विश्लेषणात अर्जेंटिना, चिली, कोलंबिया, मेक्सिको आणि पेरू येथील १८ ते ८८ वयोगटातील २,९०० हून अधिक स्पॅनिश भाषिकांचा समावेश होता. यापैकी सुमारे १,५०० व्यक्ती पूर्णपणे निरोगी होत्या; तर उर्वरित व्यक्तींमध्ये मध्यम स्वरूपाची बौद्धिक अक्षमता (Mild Cognitive Impairment), अल्झायमर किंवा ‘फ्रंटोटेंपोरल डिमेन्शिया’ची लक्षणे होती. अभ्यासादरम्यान प्रत्येक व्यक्तीने सात वेगवेगळ्या चाचण्या पूर्ण केल्या. यामध्ये ॲनिमेटेड व्हिडीओचे वर्णन करणे, ६० सेकंदात शक्य तितके शब्द, भाज्या किंवा प्राण्यांची नावे सांगणे आणि एखादी छोटी गोष्ट ऐकल्यानंतर ती लगेच तसेच २० ते ३० मिनिटांनी पुन्हा सांगणे यांचा समावेश होता. शास्त्रज्ञांनी या सर्व चाचण्यांचे रेकॉर्डिंग करून त्यांचे शब्दांकन केले. त्यानंतर बोलण्यातील विराम, बोलण्याचा वेग, आवाजाची पट्टी, शब्दसंग्रह आणि भावनिक अभिव्यक्ती यांसह आवाजाच्या ७०० हून अधिक वैशिष्ट्यांचा सखोल अभ्यास केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT