विश्वसंचार

नेपच्यून आणि युरेनस दिसले मूळ रंगात!

Arun Patil

लंडन : आपली पृथ्वी अवकाशातून पाहिल्यावर निळीशार दिसत असते. मंगळ ग्रह लालसर दिसत असतो. अन्यही ग्रहांचे स्वतःचे वेगळे रंग असतील अशी यामुळेच आपली धारणा झालेली असते. नेपच्यून आणि युरेनसबाबतच्या अशाच धारणांना आता छेद गेला आहे. 1980 च्या दशकातील अंतराळ मोहिमांमधून असे दर्शवले होते की नेपच्यून हा ग्रह गडद निळ्या रंगाचा असून युरेनस हिरवट रंगाचा आहे. मात्र आता नव्या संशोधनातून असे दिसले आहे की हे दोन्ही ग्रह हलक्या हिरवट निळ्या रंगाचे आहेत.

यापूर्वीची नेपच्यूनची छायाचित्रे ही तेथील वातावरणाला दर्शवणारी होती. त्यामुळे ग्रहाचा मूळ रंग मागे पडला होता. अस्ट्रॉनॉमर रॉयल फॉर स्कॉटलंड आणि एडिनबर्ग युनिव्हर्सिटीतील प्राध्यापिका कॅथरीन हेमन्स यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले, यापूर्वी नेपच्यूनला गडद निळ्या रंगात दर्शवण्यामागे तेथील वातावरणाची स्थिती दाखवणे हा होता. त्यामुळे नेपच्यून अतिशय गडद अशा निळ्या रंगाचा दिसतो. मात्र वास्तवात हा ग्रह तितका निळा नसून त्याचा रंग साधारणपणे युरेनससारखाच आहे.

यापूर्वीही अनेक खगोलशास्त्रज्ञांना वाटत होते की या दोन्ही ग्रहांची बहुतांश छायाचित्रे ही त्यांचा खरा रंग दर्शवणारी नाहीत, असे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रा. पॅट्रिक आयर्विन यांनीही सांगितले. 'नासा'च्या 'व्होएजर-2' यानाने या ग्रहांची तीन वेगवेगळ्या रंगातील प्रतिमा टिपल्या होत्या. आता संशोधकांनी हबल स्पेस टेलिस्कोप इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफ व युरोपियन सदर्न ऑब्झर्व्हेटरीच्या व्हेरी लार्ज टेलिस्कोपचा डेटा वापरून हा खुलासा केला आहे. त्यामधून दिसते की या दोन्ही ग्रहांचा रंग हिरवट निळा आहे. अर्थात संशोधकांना त्यामध्ये थोडासा फरकही आढळला. नेपच्यूनमध्ये थोडासा अधिक निळसरपणा आहे, तर युरेनसमध्ये हिरवटपणा थोडा अधिक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT