कैरो : प्रसिद्ध पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि इजिप्तचे माजी पुरातत्त्व मंत्री झाही हवास यांनी आपल्या निवृत्तीपूर्वी एक मोठी घोषणा केली आहे. प्राचीन इजिप्तची अत्यंत प्रभावशाली राणी ‘नेफरतिती’ हिच्या थडग्याचा शोध घेण्याच्या ते अतिशय जवळ असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
झाही हवास यांच्या जीवनावर आधारित ‘द मॅन विथ द हॅट’ हा नवीन माहितीपट 20 जानेवारी रोजी विविध स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. या माहितीपटात बोलताना हवास म्हणाले, ‘जर मला हा शोध लावता आला, तर इजिप्तच्या सर्वात महत्त्वाच्या राणीच्या थडग्याचा शोध लावून माझ्या कारकिर्दीचा शेवट करताना मला प्रचंड आनंद होईल.‘राणी नेफरतिती ही राजा ‘अखेनातेन’ (इ.स.पूर्व 1353-1336) याची पत्नी होती.
या राजाने इजिप्तमध्ये अनेक देवांच्या पूजेऐवजी केवळ ‘आतेन’ (सूर्यदेव) या एकाच देवाची पूजा करण्याची धार्मिक क्रांती घडवून आणली होती. काही पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते, पतीच्या मृत्यूनंतर नेफरतितीने ‘नेफरनेफरुआतेन’ हे नाव धारण करून काही काळ इजिप्तवर राजा (फेरो) म्हणून शासन केले होते. अनेक प्राचीन चित्रांमध्ये ती शत्रूचा संहार करताना दिसते, जे अधिकार सहसा केवळ पुरुषांना (फेरो) असायचे. हवास आणि त्यांची टीम गेली अनेक वर्षे इजिप्तच्या ‘व्हॅली ऑफ द किंग्स’ भागात उत्खनन करत आहे. सध्या त्यांचे काम पूर्व खोर्यात, राणी हत्शेपसुतच्या थडग्याजवळ सुरू आहे.
हवास सांगतात की, ‘आमच्याकडे सध्या ठोस पुरावा नसला तरी, माझी अंतर्प्रेरणा सांगते की नेफरतितीचे थडगे याच भागात असण्याची शक्यता आहे. हे काम वेगाने सुरू असून लवकरच हा शोध लागू शकतो. या माहितीपटात हवास यांनी केवळ शोधाबद्दलच नाही, तर इजिप्तचा सांस्कृतिक वारसा परत आणण्याबद्दलही भाष्य केले आहे. ते सध्या पुढील तीन महत्त्वाच्या वस्तू इजिप्तला परत मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 1. रोसेट्टा स्टोन (सध्या ब्रिटिश म्युझियममध्ये) 2. डेंडेरा झोडियाक (सध्या लूव्र म्युझियममध्ये) 3. नेफरतितीचा पुतळा/अर्धपुतळा (सध्या जर्मनीतील न्यूस म्युझियममध्ये). हवास यांच्या मते, या वस्तू इजिप्शियन अस्मितेचे प्रतीक आहेत आणि त्यांचे खरे स्थान कैरो येथील नवीन ‘ग्रँड इजिप्शियन म्युझियम’ मध्येच असायला हवे.