वॉशिंग्टन ः मानवी संस्कृतीने काळाच्या ओघात प्रचंड प्रगती केली आहे. बदलत्या काळानुसार आपल्या राहणीमानात, जीवनशैलीत आणि घरांच्या रचनेत (डिझाईन) मोठे बदल झाले आहेत. आज जगभरात आधुनिक आणि गगनचुंबी इमारतींचे फॅड आले असताना, अमेरिकेतील एका प्राचीन जमातीने मात्र आपली परंपरा अगदी मनापासून जपली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध ‘नवाजो’ या आदिवासी जमातीने आपले पारंपरिक निवासस्थान आजही जतन करून ठेवले असून, या घराला ‘होगन’ असे म्हटले जाते.
हे घर आजच्या आधुनिक जगात त्यांच्या प्राचीन संस्कृतीची आणि अस्तित्वाची मुख्य ओळख टिकवून आहे. ‘होगन’ हे केवळ राहण्याचे ठिकाण नसून ते निसर्ग, सामाजिक जीवन आणि तिथल्या लोकांच्या सखोल धार्मिक आस्थेचे एक सुंदर प्रतीक मानले जाते. ही घरे बनवण्यासाठी लाकूड, माती आणि स्थानिक नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो, ज्यामुळे ती पर्यावरणापूरक ठरतात. नवाजो जमातीच्या लोकांच्या मते, होगनच्या रचनेमध्ये त्यांच्या पूर्वजांचा इतिहास आणि धार्मिक श्रद्धा जोडलेली आहे. प्रत्येक होगनच्या उभारणीत एक ठराविक आध्यात्मिक कोन असतो. आजूबाजूला आधुनिक सिमेंटची घरे उभी राहत असतानाही, या जमातीने आपल्या पुढील पिढीला संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी ही घरे जशीच्या तशी जिवंत ठेवली आहेत. आधुनिकतेच्या गतीमध्ये आपली पाळेमुळे न विसरता निसर्गाशी नाते सांगणारी ही जीवनशैली आजच्या जगासाठी कौतुकाचा आणि आकर्षणाचा विषय ठरत आहे.