वॉशिंग्टन : नासाच्या ‘लुसी’ या अंतराळयानाने पृथ्वीवरून प्रक्षेपित झाल्यानंतर पाच वर्षांत २.२ अब्ज मैलांहून अधिक अंतर पार करत गुरू ग्रहाच्या कक्षेतील ट्रोजन लघुग्रहांच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. या क्षेत्रात पोहोचणारे लुसी हे पहिलेच अंतराळयान ठरले आहे. सूर्यमालेच्या सुरुवातीच्या काळातील ग्रहांची निर्मिती आणि त्यांची सध्याची स्थिती समजून घेण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
लुसीचे प्रक्षेपण १६ ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात आले होते. या यानाने गुरूच्या कक्षेतील चौथ्या लाग्रांज बिंदूवर (एल-४) प्रवेश केला आहे. या ठिकाणी गुरूच्या पुढे सूर्याभोवती फिरणाऱ्या ट्रोजन लघुग्रहांचा मोठा समूह आहे. गुरूच्या कक्षेत अशा दोन लघुग्रह समूहांचे अस्तित्व आहे. एल-४ क्षेत्रात ग्रहाच्या पुढे, तर एल-५ क्षेत्रात त्याच्या मागे लघुग्रह फिरतात. सूर्य आणि गुरू यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या संयुक्त प्रभावामुळे या भागांत हजारो लघुग्रह स्थिर कक्षेत टिकून आहेत. गुरूपासून या दोन्ही समूहांचे अंतर सुमारे ४८४ दशलक्ष मैल आहे. समूहातील लघुग्रह एकमेकांपासून सरासरी सहा दशलक्ष मैल अंतरावर आहेत. त्यामुळे लुसीच्या कॅमेऱ्यांतून ते दूरवरच्या ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर प्रकाशबिंदूंसारखे दिसतील. रेडिओ संदेश आणि यानाने टिपलेल्या ताऱ्यांच्या प्रतिमांच्या आधारे नासाच्या अभियंत्यांनी त्याचे स्थान निश्चित केले.
लुसीच्या ट्रोजन क्षेत्रातील पहिल्या जवळच्या भेटीचे नियोजन ११ ऑगस्ट २०२७ रोजी आहे. त्या दिवशी हे यान ‘युरिबेट्स’ या लघुग्रहाजवळून जाणार आहे. त्यानंतर सप्टेंबर २०२७ मध्ये ‘पॉलीमेल’, एप्रिल २०२८ मध्ये ‘ल्यूकस’ आणि नोव्हेंबर २०२८ मध्ये ‘ओरस’ या लघुग्रहांचा अभ्यास केला जाणार आहे. प्रत्येक लघुग्रहाजवळून जाताना काही तासांच्या कालावधीत त्याची जवळून निरीक्षणे आणि छायाचित्रे घेतली जातील.
यापूर्वी लुसीने मुख्य लघुग्रह पट्ट्यातील दोन लघुग्रहांचा अभ्यास केला आहे. १ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘डिंकाइनेश’जवळून जाताना त्याचा ‘सेलम’ नावाचा लहान उपग्रह आढळला. दोन खगोलीय वस्तू एकमेकांना जोडलेल्या असलेल्या ‘कॉन्टॅक्ट बायनरी’ रचनेचे हे महत्त्वाचे उदाहरण ठरले. २० एप्रिल २०२५ रोजी यानाने ‘डोनाल्डजोहानसन’ या लघुग्रहाचे सुमारे ९६० किलोमीटर अंतरावरून निरीक्षण केले.
२०३० मध्ये पृथ्वीजवळून पुन्हा गुरुत्वीय झेप घेतल्यानंतर लुसी गुरूच्या मागील बाजूच्या एल-५ क्षेत्राकडे रवाना होईल. मार्च २०३३ मध्ये ‘पॅट्रोक्लस’ आणि ‘मेनोएटियस’ या एकमेकांभोवती फिरणाऱ्या दोन लघुग्रहांचा अभ्यास करणे हे मोहिमेचे अंतिम उद्दिष्ट आहे. सुमारे ४.५ अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमालेची निर्मिती कशी झाली, याचे धागेदोरे या आदिम खगोलीय वस्तूंच्या अभ्यासातून मिळण्याची वैज्ञानिकांना अपेक्षा आहे.