वॉशिंग्टन : 50 वर्षांहून अधिक काळानंतर चंद्रावर मानवाला पुन्हा पाठवण्यासाठी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ सज्ज झाली आहे. ‘आर्टेमिस 2’ या मोहिमेंतर्गत 6 फेब्रुवारी 2026 या सुरुवातीच्या तारखेला अंतराळवीर चंद्राच्या प्रदक्षिणेसाठी झेप घेऊ शकतात. या ऐतिहासिक मोहिमेची अंतिम तयारी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. ‘आर्टेमिस 3’ या त्यानंतरच्या मोहिमेत प्रत्यक्ष चांद्रभूमीवर पुन्हा एकदा मानवाचे पाऊल पडेल.
नासाच्या या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मानवाला पुन्हा चंद्रावर नेणे हा आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेद्वारे पहिली महिला अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. ‘आर्टेमिस 2’ ही या मालिकेतील पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल. यामध्ये चार अंतराळवीर 10 दिवसांच्या प्रवासासाठी चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पुन्हा पृथ्वीवर परततील. ही मोहीम ‘आर्टेमिस 3’ ची पूर्वतयारी आहे, ज्याचा उद्देश 2028 पर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर मानवाला उतरवणे हा आहे. नासाच्या ‘एक्सप्लोरेशन सिस्टम्स डेव्हलपमेंट’च्या कार्यकारी सहयोगी प्रशासक लोरी ग्लेझ म्हणाल्या, ‘आम्ही आर्टेमिस 2 च्या प्रक्षेपणाच्या अतिशय जवळ आहोत.
मात्र, प्रत्येक टप्प्यावर अंतराळवीरांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असेल. या मोहिमेसाठी नासा ‘स्पेस लॉन्च सिस्टम’ (SLS) हे महाकाय रॉकेट आणि ‘ओरियन’ (Orion) अंतराळयान वापरणार आहे. हे रॉकेट 322 फूट उंच आहे, जे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही उंच आहे. 17 जानेवारी रोजी हे रॉकेट फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरच्या लॉन्च पॅडवर हलवले जाणार आहे. 4 मैलांचे (6 किमी) हे अंतर कापण्यासाठी सुमारे 12 तासांचा वेळ लागू शकतो. नासाने स्पष्ट केले आहे की, 6 फेब्रुवारी ही सुरुवातीची तारीख असली, तरी हवामान किंवा तांत्रिक कारणांमुळे एप्रिल 2026 पर्यंत हे प्रक्षेपण पुढे जाऊ शकते. सध्या इंजिनीअर्स जमिनीवरील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेतील गळती सारख्या तांत्रिक बाबींची तपासणी आणि दुरुस्ती करत आहेत. मानवाच्या चंद्रमोहिमेचा हा दुसरा टप्पा संपूर्ण जगासाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे.