विश्वसंचार

‘नासा’ चंद्रावर चालवणार चक्क ट्रेन!

Arun Patil

वॉशिंग्टन : सध्या जगभरातील अनेक देशांनी चंद्राकडे लक्ष केंद्रित केलेले आहे. त्यामध्ये अर्थातच अमेरिकेच्या 'नासा' या अंतराळ संशोधन संस्थेचा समावेश आहे. 'नासा'च्याच 'अपोलो' मोहिमांमध्ये चांद्रभूमीवर अनेक अंतराळवीर जाऊन आले होते. त्यानंतर आता गेल्या अर्धशतकाच्या काळात एकही माणूस चंद्रावर गेलेला नाही. मात्र 'आर्टेमिस' मोहिमेतून पुन्हा एकदा चंद्रावर माणूस पाठवण्याचे 'नासा'चे प्रयत्न सध्या सुरू आहेत. एकीकडे चीनकडून अनेक चांद्रमोहिमा सुरू केल्या जात असतानाच, दुसरीकडे अमेरिकेलाही या स्पर्धेत मागे राहण्याची इच्छा नाही. चंद्रावर उतरल्यानंतर जास्तीत जास्त अंतर कमी वेळेत कापता यावे, यासाठी तिथे परिवहन सुविधाही तयार करण्याचे प्रयत्न अनेक देशांचे आहेत. 'नासा' तर तिथे चक्क ट्रेन सुरू करण्याचा विचार करीत आहे.

चंद्रावर अधिक दूरवर जाता यावे, यासाठी तिथे एक रेल्वे सिस्टीम असावी, असे 'नासा'ला वाटते. जर त्यामध्ये 'नासा'ला यश मिळाले, तर प्रथमच चंद्रावर ट्रेनही धावत असताना दिसेल. अर्थात ही ट्रेन पृथ्वीप्रमाणे दोन रुळांची नसेल. यापूर्वी 'अपोलो' मोहिमेत चंद्रावर अंतराळवीरांनी बग्गी चालवली होती. आजही अशा प्रकारची बग्गी चालवणेच तिथे अधिक सोयीचे आहे. गोल्फ बग्गीसारखे हे यांत्रिक वाहन तिथे सध्या परिवहनाचे चांगले साधन ठरू शकते. मात्र, जर भविष्यात चंद्रावर लोकसंख्या वाढली आणि तेथील खनिजांचे उत्खनन करण्यासाठी खाणकाम सुरू झाले, तर मोठ्या स्वरूपातील परिवहन सुविधा निर्माण करणे गरजेचे ठरणार आहे. त्यासाठीर'फ्लोट' नावाचे एक नवे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. ते चंद्रावर अंतराळवीरांसाठी पेलोड डिलिव्हरीसाठी सुविधा उपलब्ध करून देईल, असे संशोधकांना वाटते.

'नासा'ने चुंबकाच्या सहाय्याने चालणार्‍या या रेल्वेसाठीच्या निधीत वाढ केली आहे. ही योजना एखाद्या विज्ञानकथेत किंवा सायन्स फिक्शन चित्रपटात शोभेल अशीच आहे. 'फ्लोट'चा अर्थ 'फ्लेक्झिबल लॅव्हिटेशन ऑन ए ट्रॅक' असा आहे. 'नासा'च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीकडून ही योजना संचालित होत आहे. तिला 'नासा'च्या इनोव्हेटिव अ‍ॅडव्हान्स्ड कॉन्सेप्ट प्रोग्राममधील संशोधनाच्या दुसर्‍या टप्प्यात विकसित केले जात आहे. दुसर्‍या कन्सेप्टमध्ये ज्यावर सध्या काम सुरू आहे, त्यामध्ये पल्स्ड प्लाझ्मा रॉकेट आणि एका मोठ्या ऑप्टिकल ऑब्झर्व्हेटरीचा समावेश आहे. जे रॉकेट बनवले जात आहे त्याच्या सहाय्याने पृथ्वीवरून सौरमंडळात कुठेही वेगाने जाता येऊ शकेल. चंद्रावरील रेल्वे सिस्टीम पुढील दशकापर्यंत सुरू होऊ शकते. 'नासा'चे रोबोटिक्स इंजिनिअर एथन स्केलर या योजनेचे नेतृत्व करीत आहेत. त्यांचे अनुमान आहे, की ही रेल्वे एका दिवसात 100 टन मालवाहतूक करू शकेल. ही रेल्वे ट्रॅकवरून तरंगत पुढे जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT