Voyager 1 shutdown | ऊर्जेअभावी ‘व्हॉयेजर 1’चे महत्त्वाचे उपकरण ‘नासा’ने केले बंद 
विश्वसंचार

Voyager 1 shutdown | ऊर्जेअभावी ‘व्हॉयेजर 1’चे महत्त्वाचे उपकरण ‘नासा’ने केले बंद

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : गेल्या अर्ध्या शतकापासून (सुमारे 49 वर्षे) अवकाशात प्रवास करणार्‍या ‘व्हॉयेजर 1’ या ऐतिहासिक अंतराळयानाची ऊर्जा आता संपत चालली आहे. ही ऊर्जा वाचवण्यासाठी नासाने एका अत्यंत कठीण निर्णयात यानातील महत्त्वाचे शास्त्रीय उपकरण कायमचे बंद केले आहे. या मोहिमेचा कालावधी वाढवण्यासाठी नासा आता ‘बिग बँग’ नावाचा एक धाडसी प्रयोग करणार आहे.

शुक्रवारी (17 एप्रिल) नासाने व्हॉयेजर 1 ला ‘लो-एनर्जी चार्ज्ड पार्टिकल’ (LECP) हे उपकरण बंद करण्याचे आदेश दिले. गेल्या 49 वर्षांपासून हे उपकरण अवकाशातील आयन, इलेक्ट्रॉन आणि वैश्विक किरणांचा अभ्यास करत होते. 27 फेब—ुवारी रोजी केलेल्या एका नियोजित हालचालीमुळे यानातील ऊर्जेत अनपेक्षित घट झाली, ज्यामुळे शास्त्रज्ञांना हे पाऊल उचलावे लागले. 1977 मध्ये प्रक्षेपित झालेल्या व्हॉयेजर 1 चा मूळ उद्देश गुरू आणि शनी ग्रहांचे सर्वेक्षण करणे हा होता. मात्र, हे यान इतके सक्षम निघाले की, त्याची मोहीम वारंवार वाढवण्यात आली.

2012 : व्हॉयेजर 1 ने सूर्यमालेची सीमा ओलांडून ‘आंतरतारकीय अवकाशात’ (Interstellar Space) प्रवेश केला. विक्रम : सौरमालेच्या बाहेरून माहिती पाठवणारे हे पहिले आणि पृथ्वीपासून सर्वात दूर गेलेले मानवनिर्मित यान आहे. व्हॉयेजर 1 आणि त्याचे जुळे यान ‘व्हॉयेजर 2’ ही दोन्ही याने रेडिओआइसोटोप थर्मोइलेक्ट्रिक जनरेटरवर चालतात, जे प्लुटोनियमच्या किरणोत्सर्गी क्षयातून ऊर्जा निर्माण करतात. दरवर्षी या यानांची ऊर्जा साधारणपणे 4 वॅटने कमी होत आहे. सध्या व्हॉयेजर 1 मधील 10 पैकी केवळ 2 उपकरणे सुरू आहेत, तर व्हॉयेजर 2 मधील 3 उपकरणे कार्यरत आहेत.

‘ऊर्जेची उपलब्धता आता अत्यंत कमी झाली आहे. यानाला उबदार ठेवण्यासाठी आणि इंधनाच्या वाहिन्या गोठण्यापासून वाचवण्यासाठी आम्हाला उपकरणांचे हिटर्स बंद करावे लागत आहेत,’ असे नासाच्या ‘जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी’ने (JPL) स्पष्ट केले. व्हॉयेजर 1 चे आयुष्य केवळ एक वर्षाने वाढवण्यासाठी नासा आता ‘बिग बँग’ नावाची प्रक्रिया राबवणार आहे. या अंतर्गत, यानातील सध्या सुरू असलेली काही उपकरणे बंद करून त्यांच्या जागी कमी ऊर्जा लागणारे पर्याय सुरू केले जातील. यामुळे यान उबदार राहील आणि या उन्हाळ्यापर्यंत शास्त्रज्ञांना अधिक वैज्ञानिक डेटा गोळा करता येईल, अशी आशा मोहिमेच्या व्यवस्थापकांना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT