वॉशिंग्टन : नासाची एक अत्यंत महत्त्वाची आणि अग्रगण्य अंतराळ दुर्बीण आता अधिकृतपणे बंद झाली आहे. जगभरातील अंतराळप्रेमींसाठी (विशेषतः 'स्विफ्टिज'साठी) ही एक दुःखाची बातमी आहे. 'बिग बँग'नंतर विश्वातील सर्वात शक्तिशाली स्फोटांचा माग ठेवणारी 'निल गेहेरेल्स स्विफ्ट वेधशाळा' हिने आपली २० वर्षांहून अधिक काळ चाललेली मोहीम आता पूर्ण केली आहे. नासाच्या घोषणेनुसार, वेधशाळा आपल्या कक्षेत खूप खाली आल्यामुळे विश्वाची अचूक मोजमापे घेणे अशक्य झाले होते. त्यानंतर 'स्विफ्ट' टीमने मंगळवारी (२० ऑक्टोबर) या दुर्बिणीचे वैज्ञानिक कामकाज बंद केले.
आगामी काही आठवड्यांत 'स्विफ्ट' पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल आणि जळून नष्ट होईल. तीव्र सौर हालचालींमुळे पृथ्वीच्या कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहांवर वाढणारा ताण (drag) आणि अंतराळयानांना टिकवून ठेवण्यातील अडचण यामुळे 'स्विफ्ट'ची उंची सतत कमी होत होती. ऑगस्ट महिन्यात एका खासगी अंतराळयानाच्या मदतीने 'स्विफ्ट'ची कक्षा उंचावण्याचा प्रयत्न फसला होता, ज्यामुळे ही मोहीम वाचवण्याची शेवटची आशाही मावळली.
सध्या पृथ्वीपासून केवळ १७१ मैल (२७५ किलोमीटर) अंतरावर प्रदक्षिणा घालत असलेली ही दुर्बीण आता अंतराळाचे कोणतेही विश्वासार्ह निरीक्षण करू शकत नाही. जरी आता ही दुर्बीण संपुष्टात आली असली, तरी तिने आपल्या मूळ उद्दिष्टापेक्षा कैक पटीने अधिक कामगिरी केली आहे. प्रक्षेपण : हा उपग्रह नोव्हेंबर २००४ मध्ये अवकाशात सोडण्यात आला होता. मूळ आयुर्मान : या मोहिमेचा प्राथमिक काळ केवळ दोन वर्षे ठरवण्यात आला होता. प्रत्यक्ष आयुर्मान : ठरवलेल्या मर्यादेच्या पलीकडे जात 'स्विफ्ट'ने तब्बल २२ वर्षे आपले काम यशस्वीपणे पार पाडले.