वॉशिंग्टन : भारताच्या ‘चांद्रयान-1’ या मोहिमेवेळी चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचा शोध सर्वप्रथम लागला होता; मात्र हे पाणी बनते कसे याचे संशोधकांना कुतूहल होते. आता ‘नासा’च्या नेतृत्वाखालील एका नव्या प्रयोगातून असे संकेत मिळाले आहेत की, सूर्याच्या दिशेने येणार्या सततच्या प्रोटॉन वार्यांमुळे चंद्रावर पाण्याचे रेणू तयार होत असावेत. याचा अर्थ सौरवार्यांमुळे किंवा त्यामधील कणांमुळे चंद्रावर पाणी बनवण्यास मदत होते.
अनेक अंतराळ मोहिमांमधून चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे रेणू आणि हायड्रॉक्सिल (OH) रेणू, जे पाण्याचे घटक आहेत, यांचे अंश सापडले आहेत; मात्र हे पाणी नेमकं कुठून येतं, हे अजूनही एक कोडंच आहे. काही सिद्धांतांनुसार हे पाणी चंद्राच्या ज्वालामुखीजन्य क्रियेमुळे, चंद्राच्या आतील थरांमधून होणार्या वायू उत्सर्जनामुळे किंवा सूक्ष्म उल्कांच्या आघातामुळे निर्माण होत असावं.
नासाचा नवीन प्रयोग, जो JGR Planets या नियतकालिकात प्रसिद्ध झाला, एका वेगळ्या संकल्पनेचा अभ्यास करतो, सौर वार्यांमुळे पाणी तयार होण्याची शक्यता आहे. सौर वारा म्हणजे सूर्यापासून 10 लाख मैल प्रति तास (1.6 दशलक्ष किमी/तास) या वेगाने येणार्या विद्युतभारित कणांचा सततचा प्रवाह. पृथ्वीच्या वातावरणात हे कण आल्यावर ऑरोरा म्हणजेच रंगीबेरंगी उत्तर किंवा दक्षिण ध्रुवीय प्रकाश तयार होतो.
पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे आपल्याला या सौर वार्यांपासून मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळते; पण चंद्रावर हे संरक्षण फारच कमी किंवा ठिकठिकाणी खंडित स्वरूपात आहे. पाणी तयार होण्यासाठी लागणारे ऑक्सिजन चंद्राच्या धूळ आणि खडकांमध्ये भरपूर प्रमाणात असतो. मात्र, हायड्रोजन कमी असतो. सौर वार्यात मुख्यत्वे प्रोटॉन असतात. हे प्रोटॉन म्हणजे इलेक्ट्रॉनविना हायड्रोजन अणू. हे प्रोटॉन चंद्राच्या पृष्ठभागावर आदळल्यावर, तिथल्या खडकांमधून इलेक्ट्रॉन घेतात किंवा उधार घेतात आणि आवश्यक त्या हायड्रोजन अणूंमध्ये रूपांतरित होतात. मग ऑक्सिजनशी संयोग होऊन तयार होतो पाणी.
नासाच्या निरीक्षणानुसार, चंद्रावर सापडणार्या पाण्याचे प्रमाण दररोजच्या चक्रानुसार बदलते. जिथे सूर्यप्रकाश पोहोचतो, तिथे पाणी वाफ होऊन उडून जाते; पण थंड भागांमध्ये ते साठून राहते. जर पाणी फक्त उल्कांमुळे तयार होत असते, तर ते हळूहळू संपत गेले असते आणि परत निर्माण होण्यासाठी नवीन उल्कांची गरज लागली असती; पण असं होत नाही. दररोज थोडं पाणी हरवूनही त्याच प्रमाणात ते परत तयार होते, जे सौर वार्याच्या सहभागाची शक्यता अधिक बळकट करते.