वॉशिंग्टन : पृथ्वीच्या वातावरणात कोसळण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या ‘नासा’च्या महत्त्वाच्या दुर्बिणीला वाचवण्यासाठी एका ऐतिहासिक बचाव मोहिमेची सुरुवात झाली आहे. या अनोख्या मोहिमेंतर्गत, एका विशेष रेस्क्यू स्पेसक्राफ्टने अंतराळात यशस्वी झेप घेतली आहे. आपल्या प्रकारची ही जगातील पहिलीच मोहीम आहे.
मार्शल आयलँडस् येथून एका सुधारित 'लॉकहीड मार्टिन एल-१०११' विमानाने उड्डाण केले. या विमानाने हवेत असतानाच 'नॉथ्रॉप ग्रुमन पेगासस एक्सएल' रॉकेटच्या साहाय्याने 'लिंक' नावाच्या रोबोटिक हात असलेल्या यानाला कक्षेत प्रक्षेपित केले. हे यान आता नासाच्या 'नील गेहरेल्स स्विफ्ट ऑब्झर्व्हेटरी' या गॅमा-रे दुर्बिणीच्या दिशेने प्रवास करेल. ही दुर्बीण हळूहळू पृथ्वीच्या दिशेने खाली येत असून, ती नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी २ आणि ३ जुलै रोजी खराब हवामान आणि सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे हे प्रक्षेपण दोनदा पुढे ढकलावे लागले होते. 'लिंक' यान कक्षेत पोहोचल्यानंतर आता त्याचे सोलर पॅनेल्स व्यवस्थित उघडले आहेत की नाही आणि त्याची पॉवर सिस्टम काम करत आहे का, याचा सुगावा घेण्यासाठी शास्त्रज्ञ सिग्नल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
'लिंक' यानाची निर्मिती 'कॅटॅलिस्ट स्पेस' या खासगी कंपनीने सुमारे ३० दशलक्ष डॉलर्स खर्चून केली आहे. २००४ मध्ये प्रक्षेपित झालेली 'स्विफ्ट दुर्बीण' अजूनही वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय उपयुक्त आहे. मात्र, पृथ्वीच्या वातावरणाच्या घर्षणामुळे तिची उंची झपाट्याने कमी होत आहे. मदत न मिळाल्यास ही दुर्बीण या वर्षाच्या अखेरीस नष्ट होऊ शकते. 'लिंक' यान आपल्या रोबोटिक हातांनी आणि थ्रस्टर्सच्या (इंजिन) साहाय्याने या दुर्बिणीला पकडून पुन्हा वरच्या सुरक्षित कक्षेत खेचून नेणार आहे. २००४ मध्ये या दुर्बिणीची किंमत २५० दशलक्ष डॉलर्स होती, जी आजच्या महागाईनुसार सुमारे ४५० दशलक्ष डॉलर्स (जवळपास ३,७०० कोटी रुपये) आहे. (१० अब्ज डॉलर्सच्या जेम्स वेब टेलिस्कोपच्या तुलनेत ही खूपच स्वस्त आहे). या मोहिमेची रचना प्रामुख्याने 'गॅमा-रे बर्स्ट्स' (Gamma-ray bursts) म्हणजेच अंतराळातील महाकाय ताऱ्यांचा अंत होऊन जेव्हा 'ब्लॅक होल' (कृष्णविवर) तयार होते, तेव्हा होणाऱ्या प्रचंड स्फोटांचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आली होती. गेल्या २० वर्षांहून अधिक काळ या दुर्बिणीने अंतराळातील अनेक रहस्ये उलगडली आहेत. ताऱ्यांच्या हालचाली, एक्स-रे फ्लेअर्स, सुपरनोव्हा स्फोट, तसेच धूमकेतू आणि लघुग्रहांचा अभ्यास करण्यात ही दुर्बीण महत्त्वाची भूमिका बजावत आहे.