वॉशिंग्टन :“परग्रहीय जीव (एलियन) अस्तित्वात आहेत, यात शंकाच नाही; पण त्यांनी कधीही पृथ्वीला भेट दिलेली नाही किंवा त्यांचे कोणतेही यान पृथ्वीवर उतरलेले नाही,” असा खळबळजनक दावा नासाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जेंट्री ली यांनी केला आहे. गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ अंतराळ मोहिमांवर काम करणार्या ली यांनी यूएफओ बाबतच्या अफवांना स्पष्टपणे फेटाळून लावले आहे.
डॉ. ली यांच्या मते, आजपर्यंत असे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत की ज्यामुळे असे सिद्ध होईल की परग्रहीय यंत्रे किंवा जीव पृथ्वीवर आले आहेत. जे लोक अशा कथांवर विश्वास ठेवतात, त्यांची दिशाभूल केली जात आहे. आपल्या आकाशगंगेत अंदाजे एक ट्रिलियन (एक लाख कोटी) ग्रह आहेत. त्यामुळे कुठेतरी जीवसृष्टी असण्याची शक्यता प्रचंड आहे. “आपण कधी ना कधी जीवसृष्टी शोधून काढूच,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पृथ्वीवरील सर्व जीव (माणूस, हत्ती किंवा बॅक्टेरिया) पुनरुत्पादनासाठी डीएनएचा वापर करतात. मात्र, परग्रहीय जीव यापेक्षा पूर्णपणे वेगळे असू शकतात, ज्यांचा जैविक आधार वेगळा असू शकतो, असे ली यांचे मत आहे.
जीवसृष्टीसाठी आशादायक ग्रह
शास्त्रज्ञांच्या मते, पुढील ग्रहांवर जीवसृष्टी असण्याची दाट शक्यता आहे :
1.टीआरएपीपीआयएसटी-1इ : पृथ्वीच्या आकाराचा हा ग्रह आपल्या सूर्यापासून 40 प्रकाशवर्षे दूर आहे.
2. के 2-18 बी : हा ग्रह पूर्णपणे महासागरांनी वेढलेला असून, तो पृथ्वीपासून 124 प्रकाशवर्षे दूर आहे.
3. शनीचे चंद्र (एन्सेलेडस आणि टायटन): आपल्या सूर्यमालेतील या चंद्रांवरही जीवसृष्टीसाठी पोषक वातावरण असू शकते.