वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'च्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळावरील आपल्या मोहिमेस सुरुवात केली आहे. तर इंज्युनिटी हे हेलिकॉप्टर पर्सिव्हरन्सच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत आहे. पर्सिव्हरन्स ज्या ठिकाणी पोहोचत नाही, त्या ठिकाणचा डाटा गोळा करण्यास इंज्युनिटी सक्षम आहे. सध्या तरी रोव्हर आणि हेलिकॉप्टर दोन्ही कार्यरत आहे.
दरम्यान, पर्सिव्हरन्स रोव्हरने मास्टकॅम-जेड-इमेजिंग सिस्टीमच्या माध्यमातून हाय रिझ्युलेशन असलेली अनेक छायाचित्रे कॅमेराबद्ध केली आहेत. या छायाचित्रांमध्ये सुमारे 45 कि.मी. रुंद एक खडकाळ भागही दिसून येत आहे. मंगळावरील हे खडक अत्यंत रहस्यमयी दिसून येत आहेत. सर्वसामान्यपणे असे खडक ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर तयार होतात. भूगर्भ शास्त्रज्ञांसाठी तर ही एक पर्वणीच आहे. यामुळे ते मंगळावरील जेजेरो क्रेटरची निर्मिती आणि विकासाबद्दल अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतील.
जेजेरो क्रेटर भागासंदर्भात असेही म्हटले जाते की, अब्जावधी वर्षांपूर्वी येथे मोठे सरोवर तसेच एखाद्या नदीचे खोरे होते. आता याच खोर्यामध्ये धूळ जमा झाली असणार. जेजेरो क्रेटरमधील याच खडकांमध्ये जीवन वाचवून ठेवण्याची जास्त क्षमता आहे. 'नासा'च्या या पर्सिव्हरन्स रोवरचे दोन प्रमुख लक्ष्य आहेत. पहिले लक्ष्य म्हणजे मंगळावरील जीवनाचे संकेत शोधणे, तर संभाव्य अॅस्ट्रॉबायोलॉजिकल महत्त्व असणारे डझनभर नमुने गोळा करणे. यामध्ये अशा खडकांनाही सहभागी करवून घेतले जाते. दरम्यान, नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या वतीने संयुक्त मोहीम राबवून मंगळावरील नमुने पृथ्वीवर आणले जाणार आहेत. यासाठी 2031 नंतर मंगळ मोहिमा राबवल्या जाणार आहेत.