वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ने अंतराळ मोहिमांच्या क्षेत्रात अत्यंत धाडसी आणि काहींच्या मते ‘जवळपास अशक्य’ वाटणार्या योजनांची घोषणा केली आहे. 2028 पर्यंत चंद्रावरील हालचाली वेगवान करणे आणि अणूऊर्जेवर चालणारे जगातील पहिले अंतराळयान प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य ‘नासा’ने ठेवले आहे.
‘नासा’ने आपल्या ‘आर्टेमिस’ कार्यक्रमात पुन्हा एकदा मोठे फेरबदल केले आहेत. मानवाच्या चंद्रावरील पहिल्या स्पेस स्टेशनचे काम तूर्तास थांबवून, त्याचे सुटे भाग आता नव्या 20 अब्ज डॉलर्स खर्चाच्या ‘मून बेस’ (चंद्रावरील तळ) साठी वापरले जाणार आहेत. ‘नासा’चे प्रशासक जॅरेड आयझॅकमॅन यांनी ‘इग्निशन’ नावाच्या परिषदेत सांगितले की, ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी चंद्रावर परतणे, तिथे कायमस्वरूपी तळ उभारणे आणि अंतराळ क्षेत्रातील अमेरिकेचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ‘नासा’ पुन्हा एकदा ‘अशक्य’ गोष्टी शक्य करून दाखवण्यासाठी कटिबद्ध आहे.’
याच कार्यक्रमात आयझॅकमॅन यांनी ‘स्पेस रिअॅक्टर-1 फ्रीडम’ या प्रकल्पाची घोषणा केली. हे अणूऊर्जेवर चालणारे जगातील पहिले आंतरग्रहीय अंतराळयान असेल. ‘नासा’चा दावा आहे की, 2028 पर्यंत हे यान मंगळाच्या मोहिमेसाठी सज्ज होईल. ‘नासा’चे हे नवे लक्ष्य अत्यंत महत्त्वाकांक्षी मानले जात आहे. कारण, केवळ एकाच वर्षात (2028 मध्ये) दोन मानवी चंद्र मोहिमा आणि एका अणूऊर्जेवर चालणार्या यानाचे प्रक्षेपण करण्याचे ‘नासा’चे नियोजन आहे. 2019 मध्ये नासाने 2024 पर्यंत चंद्रावर उतरण्याचे ध्येय ठेवले होते. मात्र, 2026 उजाडले तरी अजून ‘आर्टेमिस 2’ (मानवी प्रदक्षिणा मोहीम) प्रक्षेपित झालेली नाही.
ही मोहीम आता पुढील बुधवारी (1 एप्रिल) झेपावण्याची शक्यता आहे. नासाच्या या घाईमागे दोन मुख्य कारणे असल्याचे आयझॅकमॅन यांनी सूचित केले : 1. खर्च आणि वेळ: आर्टेमिस कार्यक्रमात गेल्या काही वर्षांत झालेला अब्जावधी डॉलर्सचा खर्च आणि वेळ वाचवणे. 2. भू-राजकीय स्पधा र्: अंतराळ क्षेत्रात अमेरिकेच्या नेतृत्वाला आव्हान देणार्या ‘शक्तिशाली प्रतिस्पर्ध्याशी’ (चीनचे संकेत) असलेली स्पर्धा.