वॉशिंग्टन ः जगभरातील संशोधक मागील अनेक वर्षांपासून मंगळ ग््राहावर जीवसृष्टीचा शोध घेत आहेत. आता ‘नासा’च्या शोध मोहिमेला एक मोठे यश मिळाले आहे. संशोधकांना मंगळ ग््राहावर जीवसृष्टी निर्माण करणारे घटक सापडले आहेत. नासाचे रोव्हर क्युरिऑसिटी मंगळावर फिरत असताना एका साध्या खडकावर आदळले. 899 किलोग््रॉम वजनाच्या रोव्हरने मऊ खडकाला चिरडले तेव्हा आतून पिवळे स्फटिक बाहेर पडले. हे स्फटिक शुद्ध सल्फर (मूलभूत सल्फर) म्हणजेच गंधक होते. मंगळावर यापूर्वीही सल्फेट सापडले आहेत. मात्र, शुद्ध सल्फरचा हा पहिलाच पुरावा आहे. हा शोध मंगळ मोहिमेतील मैलाचा दगड मानले जात आहे.
हा खडक गेडिझ व्हॅली चॅनेल नावाच्या ठिकाणी सापडला. हा मंगळावरील एक प्राचीन नदीचा प्रवाह आहे. येथे अब्जावधी वर्षांपूर्वी पाणी वाहत होते. रोव्हर या चॅनेलमधून जात असताना, त्याने या खडकाला चिरडले. शास्त्रज्ञांच्या लक्षात आले की जवळपास असे अनेक खडक आहेत, जे बाहेरून सामान्य दिसतात परंतु आत शुद्ध सल्फर असू शकतात. क्युरिऑसिटी प्रकल्पाचे शास्त्रज्ञ अश्विन वासवडा म्हणाले की, हे वाळवंटात ओॲसिस शोधण्यासारखे होते. सल्फेटस् हे पाण्यात विरघळलेल्या सल्फरपासून तयार होणारे क्षार आहेत. जेव्हा पाणी बाष्पीभवन होते तेव्हा हे सल्फेटस् मागे राहतात. मंगळावरील पाण्याचा इतिहास समजून घेण्यासाठी सल्फेटस् महत्त्वाचे आहेत. तथापि, शुद्ध सल्फरच्या निर्मितीसाठी खूप विशिष्ट परिस्थिती आवश्यक आहे.
शास्त्रज्ञांना या प्रदेशात अशा परिस्थिती दिसत नाहीत. तरीही, सल्फरचे इतके मोठे तुकडे पृष्ठभागावर पडले आहेत. याचा अर्थ असा की, मंगळाच्या भूगर्भीय इतिहासात काही गहन रहस्ये लपलेली आहेत, जी आपल्याला अजूनही माहित नाहीत. सल्फर हा जीवनासाठी आवश्यक घटक आहे. प्रथिनांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले दोन अत्यावश्यक अमीनो आम्ले तयार करण्यास मदत करतो. मंगळावर सल्फेट आधीच ज्ञात होते, त्यामुळे जीवनाच्या शक्यतेबद्दल नवीन माहिती मिळत नाही. तथापि, मंगळावर पाणी, रसायने आणि इतर जीवनदायी पदार्थ वारंवार आढळल्याने असे सूचित होते की, मंगळावर एकेकाळी जीवनासाठी योग्य परिस्थिती असावी. क्युरिऑसिटीकडे खडकांचे विश्लेषण करण्यास सक्षम शक्तिशाली उपकरणे आहेत. परंतु, जर रोव्हरने खडक ओलांडून तो चिरडला नसता, तर शुद्ध सल्फर बराच काळ सापडला नसता. आता, शास्त्रज्ञ सल्फर तिथे कसा पोहोचला हे समजून घेण्यासाठी मॉडेलिंगचा वापर करत आहेत. क्युरिऑसिटी अजूनही गेडिझ व्हॅली चॅनेलमधून पुढील खडकांची वाट पाहत फिरत आहे. कदाचित आणखी आश्चर्ये सापडतील. या शोधामुळे मंगळाबद्दलच्या शोध मोहिमेने लक्षवेधी टप्पा गाठला आहे.