न्यूयॉर्क : 11 जानेवारी 2026 रोजी कॅलिफोर्नियातील वँडनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून नासाच्या ‘पँडोरा’ या नवीन टेलिस्कोपचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. स्पेसएक्सच्या शक्तिशाली फाल्कन 9 रॉकेटद्वारे हा टेलिस्कोप पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आला. हे टेलिस्कोप विश्वातील ‘एक्सोप्लॅनेटस्’ (बाह्यग्रह - आपल्या सूर्याव्यतिरिक्त इतर तार्यांभोवती फिरणारे ग्रह) आणि त्यांच्या तार्यांचा अभ्यास करेल.
पँडोरा टेलिस्कोप नासाच्या जगप्रसिद्ध ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ला पूरक म्हणून काम करणार आहे. अॅरिझोना विद्यापीठातील खगोलशास्त्राचे प्राध्यापक आणि पँडोरा मोहिमेचे सह-संशोधक यांच्या मते, हे टेलिस्कोप अशा अडथळ्यांना दूर करण्यासाठी बनवले आहे जे लहान ग्रहांच्या सखोल अभ्यासात आणि तेथील जीवसृष्टीच्या शोधात मर्यादा आणतात. पृथ्वीवरून पाहताना हे बाह्यग्रह त्यांच्या मूळ तार्याच्या शेजारी अत्यंत फिकट बिंदूंसारखे दिसतात. या तार्यांचा प्रकाश ग्रहांच्या परावर्तित प्रकाशापेक्षा अब्जावधी पटीने जास्त तेजस्वी असतो, ज्यामुळे ग्रहांचे निरीक्षण करणे कठीण होते.
खगोलशास्त्रज्ञ हे ग्रह जेव्हा त्यांच्या तार्यासमोरून जातात, तेव्हा त्यांच्या वातावरणातून फिल्टर होऊन येणार्या प्रकाशाचा अभ्यास करतात. या प्रक्रियेची तुलना मेणबत्तीच्या प्रकाशासमोर लाल वाइनचा ग्लास धरण्याशी केली जाऊ शकते; ज्याप्रमाणे त्यातून वाइनचा दर्जा समजतो, तसेच तार्याच्या प्रकाशावरून ग्रहाच्या वातावरणातील तपशील समजतात. यातून ग्रहाच्या वातावरणात पाण्याची वाफ, हायड्रोजन, ढग आणि जीवसृष्टीचे पुरावे शोधता येतात. 2007 पासून खगोलशास्त्रज्ञांच्या लक्षात आले की, तार्यांवरील ‘स्टारस्पॉटस्’ (तार्यावरील थंड आणि सक्रिय भाग) ग्रहांच्या निरीक्षणात अडथळा निर्माण करतात.
2018-19 मध्ये केलेल्या संशोधनात असे दिसून आले की, तार्यावरील हे गडद डाग आणि चुंबकीयद़ृष्ट्या सक्रिय तेजस्वी भाग निरीक्षणांमध्ये मोठी दिशाभूल करू शकतात. या समस्येला शास्त्रज्ञांनी ‘ट्रान्झिट लाईट सोर्स इफेक्ट’ असे नाव दिले आहे. पँडोरा टेलिस्कोप प्रामुख्याने याच तांत्रिक त्रुटी दूर करून लहान परग्रहांचा अचूक डेटा मिळवण्यासाठी काम करेल, ज्यामुळे परग्रहावर जीवन आहे की नाही, हे शोधणे अधिक सुलभ होईल.