NASA moon mission | ‘नासा’ची चंद्रमोहीम लांबणीवर! 
विश्वसंचार

NASA moon mission | ‘नासा’ची चंद्रमोहीम लांबणीवर!

इंधन गळतीमुळे ’मून रॉकेट’चे लाँचिंग आता मार्चमध्ये

पुढारी वृत्तसेवा

फ्लोरिडा : अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ने आपल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी मून रॉकेटचे लाँचिंग तांत्रिक कारणास्तव मार्च महिन्यापर्यंत पुढे ढकलले आहे. सोमवारी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमध्ये इंधन भरण्याची चाचणी सुरू असताना हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायूची गळती झाल्याचे समोर आले, ज्यामुळे ही प्रक्रिया मध्येच थांबवावी लागली. सोमवारी या महाकाय रॉकेटमध्ये अतिथंड हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅस भरण्याचे काम सुरू होते. सुमारे 7 लाख गॅलन इंधन भरत असताना रॉकेटच्या खालच्या बाजूने गॅस गळती सुरू झाली.

दोनवेळा काम थांबवले : ही गळती रोखण्यासाठी दोनवेळा काम थांबवावे लागले. यामुळे तीन वर्षांपूर्वीच्या अशाच एका तांत्रिक बिघाडाच्या आठवणी ताज्या झाल्या. संपर्कात अडचणी : गॅस गळतीसोबतच टीममधील सदस्यांना आपापसांत संवाद साधण्यातही अडचणी येत होत्या. नासाने स्पष्ट केले आहे की, आता मिळालेल्या माहितीची (डाटा) सखोल तपासणी केली जाईल आणि उणिवा दूर करून मुख्य उड्डाणापूर्वी पुन्हा एकदा इंधन भरण्याची संपूर्ण चाचणी केली जाईल. या मोहिमेसाठी निवडलेले चार अंतराळवीर (तीन अमेरिकन आणि एक कॅनेडियन) गेल्या दोन आठवड्यांपासून ‘क्वारंटाईन’मध्ये होते. मात्र, लाँचिंग लांबणीवर पडल्याने त्यांना आता घरी पाठवण्यात आले आहे.

मार्चमध्ये लाँचिंगची तारीख जवळ आल्यावर, उड्डाणापूर्वी पुन्हा दोन आठवडे त्यांना क्वारंटाईन व्हावे लागेल. विशेष म्हणजे, चाचणी सुरू असताना हे चौघेही ह्यूस्टनमधून संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. हा सुमारे 10 दिवसांचा प्रवास असेल, ज्यामध्ये अंतराळवीर चंद्राच्या त्या भागापर्यंत जातील जो पृथ्वीवरून कधीच दिसत नाही (ज्याला ‘फार साईड’ म्हटले जाते). अंतराळयानातील जीवनरक्षक प्रणाली आणि इतर यंत्रणा अंतराळवीरांसाठी सुरक्षित आहेत का, हे तपासणे.

1960 आणि 70 च्या दशकातील ‘अपोलो’ मोहिमेनंतर, आता चंद्रावर मानवाचे दीर्घकाळ वास्तव्य सुनिश्चित करणे, हे नासाचे ध्येय आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास भविष्यात चंद्राच्या पृष्ठभागावर मानवाच्या सुरक्षित उतरण्याचा मार्ग मोकळा होईल. नासाने अजून मार्चमधील निश्चित तारीख जाहीर केलेली नाही. तज्ज्ञांच्या मते, कडाक्याच्या थंडीमुळे फेब्रुवारीत लाँचिंगसाठी खूप कमी वेळ उपलब्ध होता. आता नासाची टीम सर्व डेटाची बारकाईने तपासणी करून सर्व त्रुटी दूर केल्यावरच पुढील पाऊल उचलणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT