विश्वसंचार

बेन्नू लघुग्रहावरील नमुने घेऊन उद्या परतणार ‘ओसिरिस-रेक्स’ यान

Arun Patil

वॉशिंग्टन : 'नासा'चे 'ओसिरिस-रेक्स' हे अंतराळयान अंतराळातून शानदार भेट घेऊन पृथ्वीवर परतत आहे. संशोधक या भेटीची प्रतीक्षा करीत आहेत. ही 'भेट' म्हणजेे आतापर्यंतचे सर्वात मोठे लघुग्रहावरील नमुने आहेत. या मोहिमेचे संपूर्ण नाव 'ओरिजिन्स, स्पेक्ट्रल इंटरप्रिटेशन, रिसोर्स आयडेंटिफिकेशन, सिक्युरिटी रिगोलिख एक्सप्लोरर' (ओसिरिस-रेक्स) असे आहे. 'बेन्नू' नाव असलेल्या लघुग्रहावरील नमुने घेऊन हे यान रविवारी पृथ्वीवर परतणार आहे.

हे यान अमेरिकेतील उटाहच्या वाळवंटामध्ये उतरण्याची शक्यता आहे. त्याच्या आत लघुग्रहावरून गोळा केलेले सुमारे 250 ग्रॅम नमुने आहेत. 'नासा' अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार रविवारी दहा वाजता हे यान उतरण्याच्या घटनेचे लाईव्ह स्ट्रीम करणार आहे. 10.42 वाजता हे कॅप्सूल पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करील. त्यावेळी त्याचा वेग ताशी 44,498 किलोमीटर इतका असेल. तेरा मिनिटांत ते पृथ्वीला स्पर्श करील.

या अंतराळयानाला 2016 मध्ये लाँच करण्यात आले होते. त्याने आणलेले नमुने बेन्नू लघुग्रहाला तपशीलाने जाणून घेण्यास मदत करील. या लघुग्रहावर उतरून या यानाने 1.6 फूट उत्खनन करून हे नमुने गोळा केले होते. त्यामध्ये धूळ आणि छोट्या खडकांचा समावेश आहे. मे 2021 मध्ये 500 मीटर व्यासाच्या या बेन्नू लघुग्रहावरून उड्डाण करून हे यान पृथ्वीकडे झेपावले होते. दोनवेळा सूर्याची प्रदक्षिणा काढल्यानंतर ते पृथ्वीजवळ आले आहे.

उटाह टेस्ट अँड ट्रेनिंग रेंजच्या डिफेन्स डिपार्टमेंटच्या एका विशाल परिसरात ते आता उतरू शकते. लॉकहिड मार्टिन स्पेसमधील 'ओसिरिस-रेक्स' प्रोग्रॅम मॅनेजर सँड्रा फ्रायंड यांनी सांगितले की एका पॅराशूटच्या सहाय्याने हे कॅप्सूल खाली उतरेल. त्यावेळी त्याचा वेग ताशी 18 किलोमीटरपर्यंत कमी केला जाईल.

SCROLL FOR NEXT