NASA MAVEN Mission | अखेर ‘नासा’च्या ‘मावेन’ मंगळयान मोहिमेची सांगता 
विश्वसंचार

NASA MAVEN Mission | अखेर ‘नासा’च्या ‘मावेन’ मंगळयान मोहिमेची सांगता

११ वर्षांच्या यशस्वी कामगिरीनंतर यान कायमचे शांत

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : मंगळ ग्रहाचा अवकाशातून अभ्यास करणारे अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’चे ‘मावेन’ हे अंतराळयान अखेर कायमचे शांत झाले आहे. तब्बल ११ वर्षे मंगळाची परिक्रमा केल्यानंतर या मोहिमेचा अधिकृतपणे अंत झाल्याची घोषणा नासाने बुधवारी (३ जून) एका निवेदनाद्वारे केली. एका अज्ञात बिघाडामुळे या यानाची बॅटरी पूर्णपणे संपली. त्यामुळेच हा संपर्क तुटल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

‘मावेन’ (Mars Atmosphere and Volatile Evolution - MAVEN) हे यान २१ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळाच्या कक्षेत दाखल झाले होते. लाल ग्रहाच्या (मंगळ) रहस्यमय वातावरणाचा अभ्यास करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. हे यान पृथ्वीच्या एका दिवसात मंगळाभोवती साधारण ६.६ फेऱ्या पूर्ण करत होते. गेल्या दशकात या यानाने अनेक महत्त्वपूर्ण शोध लावले. यामध्ये कोट्यवधी वर्षांपासून मंगळाचे वातावरण हळूहळू कसे नष्ट होत आहे, याचे थेट निरीक्षण ‘मावेन’ने नोंदवले होते.

६ डिसेंबर २०२५ रोजी एका नियमित प्रदक्षिणेदरम्यान हे यान मंगळाच्या पाठीमागे गेले आणि अचानक त्याचा नासाशी असलेला संपर्क तुटला. यान पुन्हा समोर आल्यानंतर नासाच्या ‘डीप स्पेस नेटवर्क’ला (DSN) (पृथ्वीवरून वेगवेगळ्या अंतराळयानांशी संपर्क ठेवणारी रेडिओ अँटेनांची आंतरराष्ट्रीय यंत्रणा) मावेनकडून कोणताही सिग्नल मिळाला नाही. या समस्येची चौकशी करण्यासाठी नासाने फेब्रुवारी महिन्यात एका विशेष समितीची (Anomaly Review Board) स्थापना केली होती. या समितीने अखेर आपला अहवाल सादर केला असून, ‘हे यान आता पुन्हा सुरू करणे अशक्य आहे आणि ही मोहीम अधिकृतपणे संपली आहे,’ या निष्कर्षावर समिती आली आहे.

मावेनचा संपर्क का तुटला याचे अचूक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, आणि नासा पुढील काही महिने याचा सखोल अभ्यास करणार आहे. मात्र, प्राथमिक माहितीनुसार डिसेंबरमध्ये जेव्हा हे यान मंगळाच्या पाठीमागून बाहेर आले, तेव्हा ते अत्यंत वेगाने स्वतःभोवती फिरत (रिफ्लेक्स रोटेशन) असल्याचे संकेत डीएसएनला मिळालेल्या एका छोट्या डेटावरून समजले. यावरून यानाचा ठरलेला मार्ग बदलल्याचे स्पष्ट होते. या वेगवान फिरण्यामुळे यानाचे सोलर पॅनेल सूर्याच्या दिशेने राहू शकले नाहीत आणि बॅटरी पूर्णपणे संपल्याने यान कायमचे निकामी झाले, असा अंदाज वर्तवला जात आहे. कारण काहीही असले, तरी मंगळाच्या वातावरणाची रहस्ये उलगडणारा एक महान योद्धा आता अंतराळात शांत झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT