‘नासा’च्या ड्रॅगनफ्लाय हेलिकॉप्टरची लवकरच शनीच्या चंद्राकडे झेप  Pudhari File Photo
विश्वसंचार

‘नासा’च्या ड्रॅगनफ्लाय हेलिकॉप्टरची लवकरच शनीच्या चंद्राकडे झेप

ड्रॅगनफ्लाय हे एका कारच्या आकाराचे, अणुऊर्जेवर चालणारे हेलिकॉप्टर

पुढारी वृत्तसेवा

फ्लोरिडा : ‘नासा’चे ड्रॅगनफ्लाय मिशन एका महत्त्वाच्या टप्प्यात यशस्वी झाले आहे. त्यामुळे हे मिशन 2028 मध्ये शनीच्या टायटन चंद्राकडे झेपावण्यासाठी सज्ज झाले आहे. ड्रॅगनफ्लाय हे एका कारच्या आकाराचे, अणुऊर्जेवर चालणारे हेलिकॉप्टर आहे. ते टायटनच्या पृष्ठभागावर जीवनाची शक्यता तपासणार आहे. ‘नासा’ने जाहीर केले की, ड्रॅगनफ्लायने क्रिटिकल डिझाईन रिव्ह्यू पास केले आहे.

‘नासा’च्या निवेदनानुसार, या मिशनच्या टप्प्यात ड्रॅगनफ्लायचे मिशन डिझाईन, उत्पादन, एकत्रीकरण आणि चाचणी योजनांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता हे मिशन यान बनवण्यावर लक्ष केंद्रित करू शकते. 3.35 अब्ज डॉलर्सचे ड्रॅगनफ्लाय मिशन2019 मध्ये नासाद्वारे निवडले गेले होते. जॉन्स हॉपकिन्स अप्लाईड फिजिक्स लॅबोरेटरीच्या मार्गदर्शनाखाली हे डिझाईन तयार केले जात आहे. एलिझाबेथ टर्टल या एपीएलच्या मुख्य संशोधक आहेत.

टायटनचा अभ्यास करणे वैज्ञानिकांसाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण, या चंद्रावर एलियन्स जीवनाची शक्यता आहे. हे मिशन जुलै 2028 मध्ये स्पेसेक्स फॅल्कन हेवी रॉकेटने ‘नासा’च्या केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा येथून प्रक्षेपित केले जाईल. यानंतर हे यान शनीच्या दिशेने सुमारे सात वर्षांचा प्रवास करेल. ते टायटनच्या थंड आणि विविध पृष्ठभागांचे तीन वर्षांपेक्षा जास्त काळ अभ्यास करेल. ड्रॅगनफ्लायमध्ये कॅमेरे, सेन्सर्स आणि सॅम्पलर्स असतील, जे टायटनवरील प्रिबायोटिक केमिस्ट्री तसेच जीवनाचे संभाव्य संकेत शोधतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT