वॉशिंग्टन : अंतराळ संशोधनात सातत्यपूर्ण वीजपुरवठा ही सर्वात मोठी अडचण असते; विशेषतः जेव्हा एखादे यान सूर्यापासून दूर जाते तिथे सौरऊर्जा काम करत नाही. यावर उपाय म्हणून ‘नासा’ आता अशा एका अण्विक बॅटरीवर (Nuclear Battery) काम करत आहे, जी तब्बल 433 वर्षे टिकू शकते. हा काळ मानवाच्या साधारण पाच पिढ्यांच्या बरोबरीचा आहे.
या बॅटरीचा आधार ‘रेडिओआईसोटोप पॉवर सिस्टीम’ (RPS) आहे. हे तंत्रज्ञान नैसर्गिकरीत्या किरणोत्सर्गी पदार्थांच्या विघटनातून निर्माण होणार्या उष्णतेचे रूपांतर विजेमध्ये करते. यासाठी ‘फ्री-पिस्टन स्टर्लिंग कन्व्हर्टर’ नावाच्या यंत्राचा वापर केला जातो. हे कन्व्हर्टर अंतराळातील ‘मायक्रोग्रॅव्हिटी’ वातावरणात अत्यंत विश्वासार्ह मानले जातात; कारण ते दीर्घकाळ खराब न होता काम करू शकतात. आतापर्यंत अंतराळ मोहिमांमध्ये प्लूटोनियम-238 चा वापर केला जात असे, ज्याचे आयुष्य (Half- life) साधारणत: 88 वर्षांचे असते. मात्र, आता शास्त्रज्ञ ‘अमेरिकियम-241’ (Americium-241) या घटकावर काम करत आहेत. अमेरिकियमची हाफ-लाईफ 433 वर्षे आहे. याचा अर्थ असा की, हे घटक अतिशय हळूहळू खर्च होतात आणि शेकडो वर्षे ऊर्जा देऊ शकतात.
युनिव्हर्सिटी ऑफ लेस्टर आणि अमेरिकेतील अनेक राष्ट्रीय प्रयोगशाळा या प्रकल्पासाठी ‘नासा’ला मदत करत आहेत. जर हे तंत्रज्ञान पूर्णपणे यशस्वी झाले, तर अशा मोहिमा शक्य होतील ज्या शेकडो वर्षे अविरतपणे चालतील. आतापर्यंत अनेक मोहिमा केवळ विजेअभावी काही दशकांनंतर बंद पडल्या आहेत. या नवीन अणू सेलमुळे सौरमालेच्या बाहेरील भाग आणि ‘इंटरस्टेलर स्पेस’चा (दोन तार्यांमधील जागा) शोध घेणे अधिक सोपे होईल. सध्या हे तंत्रज्ञान चाचणीच्या टप्प्यात आहे. अद्याप कोणत्याही सक्रिय अंतराळ यानात याचा वापर झालेला नाही; परंतु प्राथमिक निकाल अत्यंत सकारात्मक आहेत. येणार्या काळात ही बॅटरी मानव इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चालणार्या ऊर्जास्रोतांपैकी एक ठरू शकते.
अखंड ऊर्जा : या बॅटरीला चार्ज करण्याची किंवा देखभालीची (चरळपींशपरपलश) गरज नसते.
सूर्यप्रकाशावर अवलंबून नाही : सौर पॅनेल निकामी ठरतात अशा ठिकाणीही ही बॅटरी स्थिर ऊर्जा देते.
दीर्घायुष्य : प्लूटोनियम बॅटरी काही दशके चालतात, तर अमेरिकियम बॅटरी शेकडो वर्षे चालू शकते. जरी सुरुवातीची शक्ती प्लूटोनियमपेक्षा थोडी कमी असली, तरी तिची टिकण्याची क्षमता अफाट आहे. यामुळे अंतराळ संशोधनाचे भविष्य बदलणार आहे.