वॉशिंग्टन ः नासाने नुकतेच धूमकेतू ‘अॅटलस’ (3 I/ ATLAS) चे काही अद्भुत आणि नवीन फोटो जारी केले आहेत. नासाच्या 12 हून अधिक अंतराळयानांनी आणि दुर्बिणींनी हे फोटो घेतले आहेत, जे आतापर्यंतचे सर्वात जवळचे आणि स्पष्ट फोटो मानले जातात. हे फोटो पाहता हा धूमकेतू आपल्या सौरमंडळापेक्षाही जुना असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मार्स, हबल, लुसी आणि 12 हून अधिक नासाच्या यानांनी व दुर्बिणींनी घेतलेले हे फोटो या धूमकेतूचे सर्वात जवळून आणि स्पष्ट दर्शन घडवतात. यामुळे शास्त्रज्ञांना या धूमकेतूच्या असामान्य रासायनिक गुणधर्मांचा (उदा. जास्त निकेल) अभ्यास करण्याची संधी मिळेल. बुधवार, 19 नोव्हेंबर रोजी नासाने धूमकेतू ‘अॅटलस’ चे हे फोटो जारी केले. अमेरिकेत 43 दिवसांच्या शटडाऊनमुळे हे फोटो गोपनीय ठेवले होते, जे आता प्रसिद्ध करण्यात आले आहेत. हा धूमकेतू म्हणजे दुसर्या सौरमालिकेतून आलेले एखादे परग्रहवासीयांचे यान असावे, असा कयास काही लोकांनी लावला होता.
मात्र, नासाचे अधिकारी निकी फॉक्स यांनी फोटोंबद्दल स्पष्टीकरण देताना सांगितले की, ‘हा केवळ एक धूमकेतू आहे, यात कोणतेही तांत्रिक संकेत नाहीत.’ हे अवकाश पिंड पृथ्वीपासून 170 दशलक्ष मैल दूर असूनही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे प्रभावित होत आहे. नासाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी आता एलियनशी संबंधित अफवा पूर्णपणे फेटाळल्या आहेत. त्यांनी जोर दिला आहे की, यात काही असामान्य रासायनिक प्रमाण दिसत असले, तरी ही वस्तू पूर्णपणे धूमकेतू प्रमाणेच वागते.
नासाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या वस्तूच्या स्वरूपाबद्दल खात्री दिली आहे : अमित क्षत्रिय (नासाचे असोसिएट अॅडमिनिस्ट्रेटर): ‘ही वस्तू फक्त एक धूमकेतू आहे आणि ती पाहण्यात आणि वागण्यातही धूमकेतू सारखीच आहे.’ निकी फॉक्स (नासा विज्ञान मिशन निदेशालयचे असोसिएट अॅडमिनिस्ट्रेटर) : ‘आम्हाला निश्चितपणे कोणतेही तांत्रिक संकेत किंवा या धूमकेतू व्यतिरिक्त दुसरे काहीतरी असल्याचा विश्वास निर्माण होईल, अशी कोणतीही गोष्ट आढळली नाही.’