NASA Moon Mission 
विश्वसंचार

NASA Moon Mission : पाच दशकांनंतरची ‌‘नासा‌’ची चांद्रमोहीम 6 मार्चला शक्य

‌‘आर्टेमिस-2‌’ मोहिमेसाठी ‌‘नासा‌’ सज्ज ः मानव जाणार चंद्राजवळ

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संस्था ‌‘नासा‌’ आपल्या ऐतिहासिक ‌‘आर्टेमिस-2‌’ मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. 50 वर्षांहून अधिक काळानंतर प्रथमच मानवाला चंद्राच्या जवळ नेणारी ही मोहीम 6 मार्च रोजी प्रक्षेपित करण्याचे नासाचे लक्ष्य आहे. 20 फेबुवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत नासाच्या अधिकाऱ्यांनी या संभाव्य तारखेची घोषणा केली. 19 फेबुवारी रोजी पार पडलेली ‌‘वेट ड्रेस रिहर्सल‌’ यशस्वी झाल्यामुळे या मोहिमेचा मार्ग मोकळा झाला आहे. या चाचणीत ‌‘स्पेस लॉन्च सिस्टम‌’ (SLS) रॉकेटमध्ये इंधन भरून प्रक्षेपणापूर्वीच्या शेवटच्या मिनिटांपर्यंतची तालीम केली जाते.

यापूर्वी 2 फेबुवारी रोजी केलेल्या पहिल्या चाचणीत हायड्रोजन गळती आणि इतर तांत्रिक समस्यांमुळे व्यत्यय आला होता. मात्र, नवीन सील्स बसवल्यानंतर गुरुवारी झालेली दुसरी चाचणी यशस्वी ठरली. इंधन भरताना काही काळ संपर्क तुटला होता, परंतु, बॅकअप यंत्रणेद्वारे काम पूर्ण करण्यात आले. ‌‘आम्ही नियोजित वेळेत एसएलएस रॉकेटमध्ये पूर्ण इंधन भरण्यात यशस्वी झालो आहोत आणि प्रक्षेपणाचे काऊंटडाऊनही यशस्वीरीत्या पार पडले आहे,‌’ असे नासाच्या ‌‘मून टू मार्स‌’ प्रोग््रााम मॅनेजर लोरी ग्लेझ यांनी सांगितले. प्रक्षेपणाची तारीख निश्चित होताच, मोहिमेवर जाणारे चार अंतराळवीर शुक्रवारपासून ह्युस्टन येथे दोन आठवड्यांच्या विलगीकरणात (क्वारंटाईन) गेले आहेत. प्रक्षेपणापूर्वी त्यांना कोणत्याही संसर्गापासून वाचवण्यासाठी ही खबरदारी घेतली जाते. पुढील आठवड्यात ‌‘फ्लाईट रेडिनेस रिव्ह्यू‌’ झाल्यानंतर प्रक्षेपणाच्या तारखेवर अंतिम शिक्कामोर्तब होईल.

इतिहास घडवणारी मोहीम

10 दिवसांचा प्रवास : हे चार अंतराळवीर 10 दिवसांच्या प्रवासात चंद्राभोवती फेरी मारून पुन्हा पृथ्वीवर परततील.

50 वर्षांनंतर पुनरागमन : 1972 मधील ‌‘अपोलो‌’ मोहिमेनंतर मानवाला चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

विविधता : या मोहिमेच्या माध्यमातून पहिल्यांदाच एक महिला आणि एक कृष्णवर्णीय व्यक्ती चंद्राच्या प्रवासावर जाणार आहे, जो जागतिक अंतराळ इतिहासातील एक मैलाचा दगड ठरेल. पुढील मोहिमेत म्हणजेच ‌‘आर्टेमिस-3‌’ मध्ये मानवाला प्रत्यक्ष चांद्रभूमीवर उतरवले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT