नवी दिल्ली : भारतीय संस्कृती आणि इतिहासात डोकावले असता, अनेकदा काही भारावणारे संदर्भ डोळ्यांसमोर येत असतात आणि थक्क करून जातात. असेच संदर्भ देशातील नद्यांबाबतही आढळतात. नद्यांची उगमस्थानापासून ते त्यांच्या उगमाच्या कथा अनेकदा विचार करायला लावतात.
देशातील अशाच एका जुन्या नदीबाबत आपण जाणून घेणार आहोत. ही आहे, भारतातील सर्वात प्राचीन नर्मदा नदी. माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सप्तमीला या नदीचा उगम झाल्याचे सांगितले जाते. यंदा हा दिवस 25 जानेवारी 2026 रोजी असल्याने या नदीच्या जयंतीचा उत्सव साजरा झाला. धर्म-शास्त्रांनुसार ही नदी 25 कोटी वर्षे जुनी असून, हिमालय पर्वत आणि गंगा नदी 3 ते 5 कोटी वर्षांपूर्वीची असल्याचं म्हटले जाते. मध्य प्रदेशातील अमकंटक येथून उगम होणारी ही नदी मूळ उगमापासून 13000 कि.मी. दूरपर्यंत वाहत जात तिचा प्रवाह पुढे खंबातच्या खाडीद्वारे सागराशी एकरूप होतो. हिंदूंसाठी नर्मदा 7 पवित्र नद्यांपैकी एक असून, ही भारतातील प्राचीन नदी आहे.
इतकंच नाही असेही म्हटले जाते की, नर्मदा ही गंगा नदीपेक्षा 5 पटींनी जुनी आहे. पुराणांपासून ते अगदी विज्ञानानंही नर्मदा नदीच्या आयुर्मानावर शिक्कामोर्तब केले आहे. या नदीच्या उगमाबाबत एक आख्यायिका सांगितली जाते, जिथे या नदीचा उगम भगवान शंकराच्या घामातून झाल्याचं म्हटलं जातं. आणखी एका कथेनुसार भगवान शंकरानं नर्मदा नदीतील प्रत्येक खडकाला शंकराच्या रूपात पूजण्याचे वरदान दिल्यानं या नदीतील प्रत्येक दगड हा शिवलिंगाप्रमाणं पूजनीय ठरतो, अशी धारणा आहे. नर्मदा नदीमध्ये डायनासोरची अंडीसुद्धा सापडली असून, त्याशिवाय अनेक जीवांचे अवशेष आणि सापळे इथं सापडल्यानं ही नदी कोट्यवधी वर्षांपासून अस्तित्वात असल्याचं सांगण्यात येतं. या नदीचं आणखी एक महत्त्व म्हणजे देशातील बहुतांश मुख्य नद्या पश्चिमेपासून पूर्वेला बंगालच्या उपसागराच्या दिशेनं वाहतात. मात्र, नर्मदेचा प्रवाह उलट असून, ती पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत वाहते.