विंडहोक : नामिबियामधील कोरड्या आणि रखरखीत ‘इटोशा पॅन’ या मिठाच्या विस्तीर्ण मैदानावर निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला आहे. एकेकाळी ओसाड असलेल्या या भागात अचानक पाच रंगीबेरंगी तलाव निर्माण झाले असून, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (आयएसएस) टिपलेली यांची छायाचित्रे सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत.
नामिबियामधील ‘इटोशा पॅन’ हे ‘द ग््रेाट व्हाईट प्लेस’ म्हणून ओळखले जाते. सुमारे 1,800 चौरस मैलांवर पसरलेला हा भाग आफ्रिकेतील सर्वात मोठ्या क्षारयुक्त मैदानांपैकी एक आहे. 2011 मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे एकुमा आणि ओशिगाम्बो या दोन नद्यांच्या पात्राबाहेर पाणी वाहू लागले. या पुराच्या पाण्याने वाळवंटातील सखल भाग व्यापला आणि काही काळापुरते हे सुंदर तलाव तयार झाले. नासाच्या अर्थ ऑब्झर्व्हेटरीने याला ‘फँटम लेक्स’ (मायावी तलाव) असे संबोधले आहे. कारण, पाण्याचे बाष्पीभवन होताच हे तलाव पुन्हा गायब होतात.
या तलावांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे गडद हिरवे, लाल, पिवळे आणि गुलाबी असे वैविध्यपूर्ण रंग. शास्त्रज्ञांच्या मते, हे रंग कोणत्याही खनिजांमुळे नसून पाण्यातील विशिष्ट प्रकारच्या शेवाळांमुळे तयार झाले आहेत. जेव्हा या क्षारयुक्त पाण्यात पावसाचे पाणी साचते, तेव्हा त्यातील सूक्ष्मजीव आणि शेवाळ वेगाने वाढू लागतात. हे शेवाळ सूर्यप्रकाशाचे ऊर्जेत रूपांतर करताना विशिष्ट रंगद्रव्ये तयार करतात, ज्यामुळे संपूर्ण तलावाला इंद्रधनुष्यी स्वरूप प्राप्त होते. यातील हिरवा तलाव सुमारे 6.5 किलोमीटर लांब असून, अंतराळातूनही स्पष्टपणे दिसून येतो. हा परिसर अतिशय उष्ण आणि कोरडा असला, तरी या तलावांच्या निर्मितीमुळे स्थानिक परिसंस्थेला नवसंजीवनी मिळते. ‘इटोशा नॅशनल पार्क’ हे सिंह, जिराफ, झेबा आणि हत्ती यांसारख्या प्राण्यांचे निवासस्थान आहे. विशेषतः जेव्हा या भागात पाणी साचते, तेव्हा हजारो फ्लेमिंगो (रोहित पक्षी) येथे प्रजननासाठी स्थलांतर करतात. स्थलांतरित पक्ष्यांसाठी हे तात्पुरते तलाव म्हणजे प्रवासादरम्यान अन्नाचा आणि पाण्याचा एक महत्त्वाचा स्रोत ठरतात.