Dinosaur Death Mystery | ६६ लाख वर्षांनी उलगडले मोठ्या ‘डायनासोर’च्या मृत्यूचे रहस्य! 
विश्वसंचार

Dinosaur Death Mystery | ६६ लाख वर्षांनी उलगडले मोठ्या ‘डायनासोर’च्या मृत्यूचे रहस्य!

पुढारी वृत्तसेवा

ओटावा, कॅनडा : सध्याच्या कॅनडातील सस्केचेचवान प्रदेशात ६६ लाख वर्षांपूर्वी वावरणारा ‘स्कॉटी’ हा आजवर शोध लागलेला जगातील सर्वात मोठा टायरासॉरस रेक्स डायनासोर मानला जातो. नुकत्याच समोर आलेल्या एका वैज्ञानिक संशोधनातून त्याच्या मृत्यूचे रहस्य कउलगडले आहे.

संशोधकांच्या मते, मृत्यूपूर्वी स्कॉटीच्या बरगडीला गंभीर दुखापत झाली होती आणि ती मोडली होती. एका ट्रायकॅराटॉप्स सोबत किंवा इतर डायनासोरसोबत झालेल्या भीषण संघर्षात दुसऱ्या डायनासोरच्या शिंगामुळे ही दुखापत झाली असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

रक्तवाहिन्यांचे दुर्मीळ जतन

अमेरिकेतील ‘ओक रिज नॅशनल लॅबोरेटरी' (ओआरएनएल) मधील शास्त्रज्ञांनी न्यूट्रॉन इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करून स्कॉटीच्या या जीवाश्म (फॉसिल) बरगडीचा अभ्यास केला. फ्रॅक्चर झाल्यावर स्कॉटीच्या शरीराने जखम भरून काढण्यासाठी हालचाल केली होती, ज्यामुळे त्या ठिकाणी लोहयुक्त रक्त वाहून सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे जाळे तयार झाले होते. जीवाश्मांमध्ये अशा प्रकारे मऊ ऊती (सॉफ्‍ट टिश्‍यू) आणि रक्तवाहिन्या जतन होणे अत्यंत दुर्मीळ मानले जाते.

दुखापत झाल्यानंतर स्कॉटीची जखम बरी होण्यास सुरुवात झाली होती; परंतु ती पूर्णपणे भरून निघण्यापूर्वीच त्याचा एका क्षारयुक्त दलदलीत मृत्यू झाला. या दलदलीमुळे त्याचे कुजणे मंदावले आणि त्यामुळेच या सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे अवशेष ६६ लाख वर्षे सुरक्षित राहिले.

‘स्कॉटिश’ व्हिस्कीवरून ठेवले ‘स्कॉटी’ हे नाव

स्कॉटीचा आकार आणि वजन : स्कॉटीची लांबी सुमारे ४२ ते ४३ फूट (१२.८ मीटर) होती आणि त्याचे वजन जवळपास १९,५०० पौंड (अंदाजे ८,८०० ते १५,००० किलो) इतके प्रचंड होते. हा डायनासोर दोन हत्ती किंवा एका लंडनच्या डबल-डेकर बसपेक्षाही भारी होता.

वय : स्कॉटी जेव्हा मरण पावला, तब्येतीने तो जवळपास ३० वर्षांचा होता. 'टायरासॉरस रेक्स' च्या जातीसाठी हे आयुर्मान तसे जास्त मानले जाते. या महाकाय डायनासोरचे अवशेष १९९१ मध्ये सापडल्यानंतर शास्त्रज्ञांनी ‘स्कॉटिश’ व्हिस्कीच्या बॉटलने आनंद साजरा केला होता, ज्यावरून त्याचे नाव ‘स्कॉटी’ ठेवण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT