युरेनसच्या चंद्रांच्या ‘अंधार्‍या’ बाजूंचे रहस्य उलगडले Pudhari File Photo
विश्वसंचार

युरेनसच्या चंद्रांच्या ‘अंधार्‍या’ बाजूंचे रहस्य उलगडले

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांच्या एका नव्या संशोधनाने युरेनस ग्रहाच्या मोठ्या चंद्रांच्या ‘अंधार्‍या’ बाजूंसंबंधीच्या आपल्या पूर्वीच्या कल्पनांना धक्का दिला आहे. काही चंद्रांच्या बाबतीत तर ही ‘अंधारी’ बाजू पूर्वीच्या अंदाजापेक्षा पूर्णपणे विरुद्ध दिशेला असल्याचे आढळून आले आहे, ज्यामुळे वैज्ञानिक समुदायात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

आपल्या सूर्यमालेतील बर्फाळ ग्रह युरेनसला 28 ज्ञात चंद्र आहेत, ज्यापैकी पाच प्रमुख चंद्र विशेष महत्त्वाचे आहेत. या मोठ्या उपग्रहांमध्ये मिरांडा हा युरेनसच्या सर्वात जवळचा चंद्र असून, त्यानंतर एरियल, अम्ब्रिएल, टायटॅनिया आणि ओबेरॉन यांचा क्रम लागतो. विल्यम शेक्सपियरच्या नाटकातील पात्रांवरून या सर्वांची नावे ठेवली गेली आहेत. हे सर्व बर्फाळ खगोलीय पिंड (472 ते 1,578 किलोमीटर व्यासाचे) युरेनसशी ‘टायडली लॉक’ (tidally locked) अवस्थेत आहेत.

याचा अर्थ, पृथ्वीच्या चंद्राप्रमाणेच, या चंद्रांची एकच बाजू नेहमी युरेनस ग्रहाकडे असते. या टायडली लॉकिंगमुळे, प्रत्येक मोठ्या चंद्राला एक ‘अग्रणी बाजू’ (leading side) असते, जी त्यांच्या कक्षेत पुढे तोंड करून असते आणि एक ‘अनुगामी बाजू’ (trailing side) असते, जी उपग्रहांच्या मागे नेहमी पाहत असते. शास्त्रज्ञांचा आतापर्यंत असा समज होता की, प्रत्येक चंद्राची अग्रणी बाजू ही विद्युतचुंबकीय प्रकाशाच्या अद़ृश्य तरंगलांबीमध्ये (जसे की अतिनील आणि अवरक्त प्रकाश) पाहिल्यास अधिक तेजस्वी दिसेल. याचे कारण म्हणजे, ग्रहाच्या चुंबकीय क्षेत्रातून (मॅग्नेटोस्फिअर) बाहेर पडणारे इलेक्ट्रॉन या चंद्रांनी पकडले जाऊन त्यांच्या अनुगामी बाजूंवर जमा व्हायला हवेत.

यामुळे किरणोत्सर्गाचे विकिरण होऊन त्या बाजू ‘अंधार्‍या’ किंवा कमी तेजस्वी दिसतील, जसे सूर्यमालेतील इतर काही चंद्रांच्या बाबतीत घडते. परंतु, एका नवीन अभ्यासात, संशोधकांनी हबल स्पेस टेलिस्कोपच्या अतिनील उपकरणांचा वापर करून एरियल, अम्ब्रिएल, टायटॅनिया आणि ओबेरॉन यांच्या तेजस्वीपणाचे मोजमाप केले. आश्चर्यकारकपणे, कोणत्याही चंद्राची अग्रणी बाजू ही त्यांच्या संबंधित अनुगामी बाजूंपेक्षा तेजस्वी नव्हती. इतकेच नव्हे, तर टायटॅनिया आणि ओबेरॉन या चंद्रांच्या बाबतीत, अनुगामी बाजू ही अग्रणी बाजूंपेक्षा अधिक तेजस्वी असल्याचे आढळून आले, ज्यामुळे प्रचलित सिद्धांताला पूर्णपणे कलाटणी मिळाली आहे. संशोधकांनी हे निष्कर्ष मंगळवारी (10 जून) अलास्कामधील अँकरेज येथे पार पडलेल्या अमेरिकन अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या 246 व्या बैठकीत सादर केले. हे संशोधन निष्कर्ष अद्याप कोणत्याही प्रतिष्ठित वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT