8000 Frog Bones | इंग्लंडमधील रोमनकालीन ८,००० बेडकांच्या हाडांचे गूढ उलगडले 
विश्वसंचार

8000 Frog Bones | इंग्लंडमधील रोमनकालीन ८,००० बेडकांच्या हाडांचे गूढ उलगडले

१,७०० वर्षांपूर्वी घुबडांनी केली होती मोठी शिकार!

पुढारी वृत्तसेवा

लंडन : इंग्लंडमधील केंब्रिजशायर भागातील एकाच खड्ड्यात पुरातत्त्‍वशास्त्रज्ञांना रोमन काळातील तब्बल ८,००० बेडकांची हाडे आढळली होती. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने बेडकांचे सांगाडे कसे जमा झाले, या प्रश्नाने गेल्या चार वर्षांपासून शास्त्रज्ञांना बुचकळ्यात पाडले होते; मात्र आता नवीन संशोधनातून हे रहस्य उलगडले असून, सुमारे १,७०० वर्षांपूर्वी घुबड आणि शिकारी पक्ष्यांनी केलेली ही एक मोठी मेजवानी होती, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे.

महामार्ग उत्खननातील आश्चर्यकारक शोध

२०१६ ते २०२२ या काळात इंग्लंडच्या ‘ए१४’ महामार्गाच्या कामादरम्यान म्युझियम ऑफ लंडन आर्किओलॉजीच्या (एमओएलए) पथकाने उत्खनन केले होते. यात २.८० लाखांहून अधिक पुरातन वस्तूंसह 'बार हिल' येथील एका छोट्या खड्ड्यात किमान ४६९ उभयचर प्राणी (प्रामुख्याने बेडूक आणि टोड) तसेच उंदरांची सुमारे ८,००० हाडे सापडली होती. सुरुवातीला कडाक्याच्या थंडीमुळे किंवा खड्ड्यात पडून हे बेडूक मेले असावेत, असा अंदाज लावला गेला होता. मानवाने ते खाल्ले असावेत असे म्हणण्यास हाडांवर कापल्याच्या कोणत्याही खुणा नव्हत्या.

हाडांच्या अभ्यासातून शिकारीचे पुरावे उघड

बोर्नमाऊथ युनिव्हर्सिटीचे पॉल क्लार्कसन आणि एमओएलएच्या विकी इवेन्स यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेडकांच्या हाताच्या हाडांचे सूक्ष्म विश्लेषण केले. ‘एन्व्हायर्नमेंटल आर्किओलॉजी’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अहवालानुसार, बहुतांश बेडकांचा मृत्यू त्यांच्या आयुष्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षातच झाला होता. हाडांवर पचनक्रियेचे सौम्य अंश आणि ती न तुटलेल्या अवस्थेत आढळल्याने ही शिकार साप किंवा पाणमांजराने नव्हे, तर ‘शॉर्ट-इयर्ड आऊल’ आणि ‘हेन हॅरियर्स’सारख्या मध्यम आकाराच्या शिकारी पक्ष्यांनी केल्याचे स्पष्ट झाले आहे.

पर्यावरणीय आणि मानवी बदलांचा परिणाम

दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात (रोमन काळात) येथील दलदलीच्या भागातील पाणी आटल्यामुळे कोरड्या पडणाऱ्या डबक्यांमध्ये बेडकांचे प्रजनन वेगाने झाले. तसेच, स्थानिक लोकांनी गुरांना चरण्यासाठी या भागातील झाडे तोडल्यामुळे बेडकांना आकाशातील शत्रूंपासून लपण्यास जागा उरली नाही. शरद ऋतूपासून वसंत ऋतूपर्यंत या शांत परिसरात मानवी वावर नसल्याने घुबडांनी येथे मुक्काम ठोकून बेडकांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT