Antarctic ice melting | अंटार्क्टिकातील बर्फ वेगाने वितळण्यामागचे गूढ उकलले Wolfgang Kaehler
विश्वसंचार

Antarctic ice melting | अंटार्क्टिकातील बर्फ वेगाने वितळण्यामागचे गूढ उकलले

वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा

पुढारी वृत्तसेवा

सिडनी : अनेक दशकांपासून जागतिक तापमानवाढीला यशस्वीपणे तोंड देणार्‍या अंटार्क्टिका खंडातील सागरी बर्फाने 2015 पासून अचानक आणि वेगाने वितळण्यास सुरुवात केली होती. संशोधकांना आता यामागचे मुख्य कारण शोधण्यात यश आले आहे.

8 मे रोजी ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, दक्षिण महासागरात सुटलेल्या तीव— वादळी वार्‍यांमुळे अंटार्क्टिकातील सागरी बर्फाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या वेगवान वार्‍यांमुळे समुद्राच्या पाण्याचे स्तर विस्कळीत झाले. परिणामी, पृष्ठभागावरील थंड आणि कमी क्षारयुक्त पाण्याची जागा खालून आलेल्या उबदार व अधिक क्षारयुक्त पाण्याने घेतली. यामुळे सुरुवातीला बर्फ वितळण्यास सुरुवात झाली. एकदा बर्फ वितळायला सुरुवात झाल्यावर परिस्थिती आणखी बिघडत गेली.

बर्फाचे प्रमाण कमी झाल्यामुळे सूर्याची किरणे अवकाशात परावर्तित होण्याचे प्रमाण घटले आणि महासागराने अधिक उष्णता शोषून घेण्यास सुरुवात केली. यामुळे बर्फ वितळण्याचा वेग शास्त्रज्ञांच्या अपेक्षेपेक्षा कित्येक पटीने वाढला. तीन टप्प्यांत घट : 2013 ते 2023 या दशकात अंटार्क्टिकातील सागरी बर्फ तीन वेगवेगळ्या टप्प्यांत घटल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. बर्फाचा विक्रमी तुटवडा : फेब—ुवारी 2023 मध्ये अंटार्क्टिकातील बर्फाच्या विस्ताराने नीचांक गाठला होता. जुलै 2023 च्या हिवाळ्यात तर पश्चिम युरोपपेक्षाही मोठा बर्फाचा तुकडा अंटार्क्टिकामधून गायब झाला होता.

परिस्थिती गंभीर : 2015 च्या संकटातून हा प्रदेश अजूनही सावरलेला नाही. 2024 मध्येही बर्फाचे प्रमाण विक्रमी पातळीपर्यंत घसरले होते, तर 2025 आणि 2026 च्या सुरुवातीलाही बर्फाचा विस्तार 1981 ते 2010 च्या सरासरीपेक्षा खूपच कमी राहिला आहे. या अभ्यासगटाचे मुख्य लेखक आणि ऑस्ट्रेलियाच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स’चे भौतिक समुद्रशास्त्रज्ञ आदित्य नारायणन यांनी सांगितले की, ‘अंटार्क्टिकाची संपूर्ण प्रणाली आता वेगळ्या पद्धतीने वागत आहे. स्पष्टपणे सांगायचे तर, तिथे काहीतरी नक्कीच बदलले आहे.‘या अचानक झालेल्या बदलाचा शोध घेण्यासाठी आदित्य नारायणन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी उपग्रह आणि दक्षिण महासागरातील सेन्सर्सकडून मिळालेल्या खर्‍या माहितीचा वापर एका विशेष ‘हायब्रिड मॉडेल’मध्ये केला. हे मॉडेल एखाद्या हवामान मॉडेलसारखेच काम करते. यामुळे वैज्ञानिकांना 2015 पासून अंटार्क्टिकामध्ये प्रत्यक्षात घडलेल्या घडामोडींचे अचूक विश्लेषण करणे शक्य झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT