लंडन : खगोलशास्त्रज्ञ सध्या विलक्षण उत्साहात आहेत आणि त्यामागे एक ठोस कारण आहे. आपल्या सूर्यमालेच्या पलीकडचा एक रहस्यमय पदार्थ सूर्याच्या दिशेने वेगाने येत आहे, ज्यामुळे शास्त्रज्ञांना दुसर्या तार्याभोवती तयार झालेल्या पदार्थाचा अभ्यास करण्याची दुर्मीळ संधी मिळाली आहे. 3आय/अॅटलास या नावाने ओळखला जाणारा हा धूमकेतू, आतापर्यंत शोधला गेलेला केवळ तिसरा आंतरतारकीय पदार्थ आहे. ग्रह किंवा लघुग्रहांच्या उलट, हा धूमकेतू येथे कायमचा थांबणार नाही. एखाद्या वैश्विक प्रवाशाप्रमाणे तो थोड्या वेळासाठी आपल्याला दर्शन देऊन कायमचा नाहीसा होईल.
आपल्या सूर्यमालेतून केवळ एकदाच होणार्या या प्रवासात, या धूमकेतूने पृथ्वीच्या जवळून प्रवास केला. शुक्रवारी 3आय/अॅटलास आपल्या ग्रहापासून सुमारे 16.8 कोटी मैल (270 दशलक्ष कि.मी.) अंतरावरून गेला. खगोलशास्त्रीयद़ृष्ट्या हे अंतर जवळचे मानले जात असले, तरी तो सूर्याच्या तुलनेत दुप्पट अंतरावर होता. केवळ काही मैल आकाराचा हा धूमकेतू साध्या डोळ्यांनी दिसत नव्हता.धूमकेतू हे सहसा बर्फ, धूळ, खडक आणि गोठलेल्या वायूंनी बनलेले घाणेरडे बर्फाचे गोळे असतात.
जेव्हा ते सूर्याच्या जवळ येतात, तेव्हा उष्णतेमुळे त्यातील बर्फाचे थेट वायूत रूपांतर होते आणि कोमा नावाचा एक चमकणारा ढग व लांब शेपूट तयार होते. बहुतेक धूमकेतू आपल्या सूर्यमालेतीलच असतात; पण 3आय/अॅटलास येथे तयार झालेला नाही.
याला किंचित लालसर रंग आहे, जो दर्शवतो की हा पदार्थ अब्जावधी वर्षे जुना आणि मूळ स्वरूपात आहे. 3आय/अॅटलास 3 ते 11 अब्ज वर्षे जुना असू शकतो. तो आपल्या सूर्यमालेपेक्षाही जुना असण्याची दाट शक्यता आहे.