एडिनबर्ग : शास्त्रज्ञांनी खोल समुद्रातील स्क्विडची आजवर कधीही न पाहिलेली प्रजाती कॅमेरात कैद केली आहे, जी समुद्राच्या तळाशी उलटी गाडली जात होती. सेफॅलोपॉडस् (cephalopods जसे की स्क्विड, ऑक्टोपस) मध्ये असे वर्तन कधीही नोंदवले गेलेले नाही. प्रशांत महासागरातील खोल भूभागावर असलेल्या क्लेरिऑन-क्लिपर्टन झोनचा अभ्यास करत असताना, जेथे खोल समुद्रातील खाणकाम करण्याचे लक्ष्य आहे, तेव्हा हा विलक्षण देखावा शास्त्रज्ञांनी टिपला.
‘इकोलॉजी’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात या टीमने या भेटीचे वर्णन केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, हा प्राणी व्हीप्लॅश स्क्विडची एक अज्ञात प्रजाती असल्याचे दिसते. अंदाजे 13,450 फूट (4,100 मीटर) खोलीवर, स्क्विडने त्याचे जवळजवळ संपूर्ण शरीर गाळात गाडले होते आणि तो उलटा लटकलेला होता, ज्याची श्वास नलिका आणि दोन लांब स्पर्शक (टेंटॅकल्स) समुद्राच्या तळाच्या वर ताठ धरलेले होते.
‘हा एक स्क्विड आहे आणि तो स्वतःला चिखलात झाकून घेत आहे, हे स्क्विडसाठी नवीन आहे आणि विशेषतः तो उलटा आहे,’ असे या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका आणि स्कॉटिश असोसिएशन फॉर मरीन सायन्सच्या खोल समुद्रातील पर्यावरणशास्त्रज्ञ अलेजांद्रा मेजिया-साएंझ यांनी सांगितले. ‘आम्ही कोणत्याही सेफॅलोपॉडमध्ये यापूर्वी असे काहीही पाहिले नव्हते. हे खूप नवीन आणि गोंधळात टाकणारे होते.’ ऑक्टोपस आणि कटलफिशमध्ये, तसेच उथळ पाण्यातल्या स्क्विड प्रजातींमध्येही स्वतःला चिखलाने झाकणे आणि गाडणे हे वर्तन यापूर्वी पाहिले गेले आहे. तथापि, खोल समुद्रातील स्क्विडमध्ये यापूर्वी कधीही असे वर्तन नोंदवले गेले नव्हते आणि तेही उलटे.