कैरो ः पिरॅमिडस्साठी प्रसिद्ध असलेल्या इजिप्तमधून पुन्हा एकदा एक धक्कादायक शोध समोर आला आहे. संशोधकांच्या दाव्यानुसार, हवारा येथील पिरॅमिडखाली एक विस्तीर्ण भूमिगत रचना आहे, ज्यात 3,000 खोल्या आणि अनेक चक्रव्यूहासारखे मार्ग असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हा दावा ‘द लेबिरिंथ, द कोलोसी अँड द लेक’ या संशोधनपत्रात करण्यात आला आहे.
जरी हवारा पिरॅमिड गीझा येथील भव्य पिरॅमिडस्प्रमाणे दिसत नसला, तरी त्याचे प्राचीन महत्त्व आणि गूढता तितकीच जबरदस्त आहे. असे मानले जाते की ही रचना प्राचीन इजिप्तच्या लोकांपूर्वी अस्तित्वात होती. प्रसिद्ध ग्रीक इतिहासकार हेरोडोटस यांनी सुमारे 2,500 वर्षांपूर्वी या भुलभुलय्याचा उल्लेख केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही भुलभुलय्या पिरॅमिडस्पेक्षाही अधिक भव्य होती. त्यांनी 500 ई.पू. मध्ये इजिप्तला भेट दिली होती आणि त्यावेळी केवळ या संरचनेचा वरचा भाग पाहिला होता. त्यांना भूमिगत भागात जाण्याची परवानगी दिली गेली नव्हती. परंतु, त्यांनी यावरून अंदाज लावला की, काही खोल्या जमिनीवर तर काही जमिनीखाली होत्या. आजवर वापरल्या जाणार्या पारंपरिक ‘डेटिंग तंत्रज्ञानाने’ अशा खोल्यांची पुष्टी करण्यात अडचण आली आहे. त्यामुळे काही संशोधक आता अधिक अचूक आधुनिक पद्धती वापरत आहेत. त्यासाठी ग्राऊंड-पेनेट्रेटिंग रडार ( GPR) आणि सॅटेलाईट स्कॅनिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, ज्यामुळे रेतीखाली लपलेल्या संरचनेचा शोध घेता येऊ शकतो. रिपोर्टनुसार हवारा पिरॅमिडमध्ये तीन विशाल मेगालिथिक ब्लॉक्स आहेत, जे प्राचीन दरवाज्यांच्या यंत्रणेसारखे कार्य करायचे, म्हणजेच हे एक प्रकारचे पुरातन सिक्योरिटी सिस्टीम होते, जे विशिष्ट मार्ग बंद करत असत. संशोधकांना असा विश्वास आहे की, ही संपूर्ण रचना रेतीखाली गाडली गेली आहे आणि काही भाग आक्रमणकार्यांनी नष्ट केले असण्याची शक्यता आहे.