वॉशिंग्टनः शनी आणि युरेनस या ग्रहांच्या दरम्यान फिरणाऱ्या एका लहान आणि विचित्र खगोलीय वस्तूभोवती असणारी कडी पूर्वीपेक्षा रहस्यमयरीत्या वेगळी दिसत असल्याचे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या नवीन निरीक्षणांवरून समोर आले आहे.
ही कडी ‘चरिकलो’ (Chariklo) नावाच्या खगोलीय वस्तूभोवती आहेत. चरिकलो हा एक ‘सेंटॉर’ प्रकारचा घटक आहे, ज्याच्यामध्ये लघुग्रह आणि धूमकेतू या दोघांचीही लक्षणे आढळतात. चरिकलोचा व्यास केवळ २५० किलोमीटर असून, तो दूरवरच्या सूर्यमालेतील सूक्ष्म खगोलीय वस्तूंच्या मोठ्या समूहाचा भाग आहे. शास्त्रज्ञांनी २०१३ मध्ये पहिल्यांदा चरिकलोच्या कड्यांचा शोध लावला होता. सूर्यमालेतील कडी असलेला हा पहिलाच लहान खगोलीय घटक ठरला होता. त्यानंतर २०१४ आणि २०१७ मध्ये जमिनीवरील दुर्बिणींच्या साहाय्याने याचा पुन्हा अभ्यास करण्यात आला. मात्र, ‘सायन्स ॲडव्हान्सेस’ या पत्रिकेत ९ सप्टेंबर रोजी प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, २०२२ मध्ये जेव्हा जेम्स वेब टेलिस्कोपद्वारे चरिकलोचे निरीक्षण करण्यात आले, तेव्हा एका दशकात या कड्यांमध्ये मोठा बदल झाल्याचे दिसून आले.
अँडालुसिया इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सचे संशोधक आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक पाब्लो सँतॉस-सांझ यांनी एका निवेदनात सांगितले की, ‘गेल्या दशकातील निरीक्षणांची जेम्स वेबच्या निरीक्षणांशी तुलना केल्यावर आम्हाला दोन्ही कड्यांमध्ये परस्परविरोधी बदल आढळून आले. आतील कड्याची पारदर्शकता लक्षणीयरीत्या वाढलेली दिसली, तर बाहेरील कड्याची पारदर्शकता कमी झालेली आढळली.’ हे बदल नेमके कसे घडून आले याचे स्पष्ट कारण संशोधकांना अद्याप माहीत नाही. परंतु, त्यांनी तीन संभाव्य शक्यता मांडल्या आहेत : १. जेम्स वेब टेलिस्कोपचे रेझोल्यूशन अत्यंत सूक्ष्म असल्याने, ते पूर्वीच्या निरीक्षणांपेक्षा या कड्यांचे अधिक घन आणि दुर्मीळ भाग पाहण्यास सक्षम ठरले असावे. २. कड्यांमधील द्रव्यात किंवा त्यांच्या कणांमध्ये प्रत्यक्ष बदल झाले असावेत. ३. जेम्स वेब टेलिस्कोप कणांचे तरंगलांबीवर आधारित दृश्य गुणधर्म पाहू शकला, म्हणजेच कणांचा आकार आणि रचनेतील बदलांमुळे ही भिन्नता दिसून आली असावी.